AC Buying Guide : नवीन एसी खरेदी करताय?; 'या' गोष्टी पाहायला विसरू नका!
AC Buying Guide : उकाड्यानं त्रस्त झाल्यामुळं एसी घेण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. आधी हे वाचा!
AC Buying Guide : तापमानाचा पारा वाढू लागला आहे. घराबाहेर उन्हाळाच्या झळा आणि घरात घामाच्या धारा अशी परिस्थिती सध्या अनेक शहरांमध्ये आहे. या काहिलीपासून दिलासा मिळावा म्हणून एसी आणि कुलरच्या खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. तुम्हीही एसी घेण्याच्या विचारात असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
ट्रेंडिंग न्यूज
एसी खरेदी करताना खोलीचा आकार ते एसीची कूलिंग क्षमता इत्यादी गोष्टी ध्यानात घ्यायला हव्या. या गोष्टींची काळजी घेतल्यास परवडणाऱ्या किंमतीत तुम्हाला जास्तीत जास्त चांगला एसी खरेदी करता येऊ शकतो. एसी खरेदी करताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याची माहिती पुढीलप्रमाणे…
खोलीचा आकार
नवीन एसी खरेदी करताना घरातील खोलीच्या आकाराचा विचार करणं आवश्यक आहे. तुमच्या खोलीचा आकार १०० ते १२० चौरस फूट असेल, तर तुम्ही १ टन एसी खरेदी करू शकता. तुमची खोली यापेक्षा मोठी असेल तर अशा खोलीत पुरेसा गारवा निर्माण करण्यासाठी १.५ ते २ टनाची एसी अधिक उपयुक्त ठरेल.
विंडो आणि स्प्लिट एसी
विंडो एसीच्या तुलनेत स्प्लिट एसीमध्ये तुम्हाला अनेक उत्तम वैशिष्ट्ये मिळतात. स्प्लिट एसी तुलनेनं जास्त महाग असतात. स्प्लिट एसी कोणत्याही खोलीत सहज बसवता येतो. विंडो एसी बसवण्यासाठी घराला खिडकी असणं आवश्यक आहे. स्प्लिट एसीमध्ये, तुम्हाला ऑनबोर्ड स्लीपिंग, टर्बो कूलिंगसह अनेक उत्कृष्ट पर्याय मिळतात.
बीईई रेटिंग पाहा!
नवीन एसी खरेदी करताना तुम्हाला बीईई रेटिंग पाहणं आवश्यक आहे. तुम्ही ५ स्टार रेटिंग असलेला एसी खरेदी केला, तर त्याची किंमत जास्त असते. मात्र ही एसी अधिक कार्यक्षम असते. या एसीमुळं विजेची खूप बचत होते.
अधिकाधिक एअर फिल्टरवाला एसी निवडा
जास्तीत जास्त एअर फिल्टर असलेला एसी निवडा. हल्ली अनेक एसी गंध फिल्टर आणि अँटी-बॅक्टेरियल फिल्टरसह येतात. तुम्ही जास्त पैसे देऊन अधिक फिल्टर असलेला एसी खरेदी करू शकता.
विभाग