मराठी बातम्या  /  latest news  /  Rishabh Pant: गुरुदक्षिणा म्हणून शॅम्पेन, शास्त्री मास्तरांचा आनंद गगनात मावेना

Rishabh Pant: गुरुदक्षिणा म्हणून शॅम्पेन, शास्त्री मास्तरांचा आनंद गगनात मावेना

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 18, 2022 11:36 AM IST

मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत शतकी खेळी करणाऱ्या रिषभ पंतला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याला बक्षीस म्हणून शॅम्पेनची बाटली मिळाली. ड्रेसिंग रूममध्ये परतण्यापूर्वी तो टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भेटण्यासाठी मैदानावर पोहोचला. शास्त्रींनी पंतला मिठी मारली आणि नंतर त्याच्या हातातून शॅम्पेनची बाटली घेतली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

pant and shastri
pant and shastri (social media video screen shot)

मँचेस्टरमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करत मालिका २-१ ने जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात ऋषभ पंतने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने १२५ धावांची नाबाद खेळी केली. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरल्यानंतर पंतला बक्षीस म्हणून शॅम्पेनची बाॅटल मिळाली. प्रेंझेंटेशन सेरेमनीनंतर पंत शॅम्पेन घेऊन ड्रेसिंग रूममध्ये न जाता तो थेट मैदानात उभ्या असलेल्या रवी शास्त्री यांच्यांकडे गेला.

त्यानंतर शास्त्रींनी प्रथम रिषभला मिठी मारली. दोघांमध्ये थोडंसं संभाषण झालं आणि त्यानंतर पंतने शॅम्पेन शास्रींना भेट दिली. हे पाहून मैदानातील प्रेक्षकांना हसू आवरता आले नाही. त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी या क्षणाचा पुरेपूर आनंद लुटला आणि शास्त्रींनी पंतकडून शॅम्पेनची बाटली घेताच चाहत्यांनी जोरजोरात जल्लोष सुरू केला. यानंतर पंत ड्रेसिंग रूममध्ये परतला.

शतकानंतर पंत काय म्हणाला-

सामन्यानंतर जेव्हा पंतला ही खेळी आठवणीत राहिल का? असे विचारण्यात आले, तेव्हा तो हसला आणि म्हणाला, “मला आशा आहे की ही खेळी खूप दिवस आठवणीत राहिल. तो पुढे म्हणाला की, या खेळीदरम्यान मी फक्त एका चेंडूचा विचार करत होतो. जेव्हा तुमचा संघ दडपणाखाली असतो आणि तुम्ही अशी फलंदाजी करता, तेव्हा खूप छान वाटते. मी नेहमीच अशी कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असतो. मला नेहमीच इंग्लंडमध्ये खेळण्याचा आनंद मिळतो. तसेच येथील परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतो. तुम्ही जितके जास्त खेळाल तितका अनुभव तुम्हाला मिळेल."

विजयाचं श्रेय भारतीय गोलंदाजांना-

भारतीय गोलंदाजीबद्दल पंत म्हणाला, “विजयाचे श्रेय आमच्या गोलंदाजांनाही जाते. फलंदाजीसाठी विकेट चांगली होती आणि आमच्या गोलंदाजांनी इंग्लंडला कमी धावसंख्येपर्यंत रोखून चांगली कामगिरी केली. आमची गोलंदाजी केवळ तिसर्‍या वन-डेतच नाही तर संपूर्ण मालिकेत चांगली होती”.

WhatsApp channel