बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गावर बसला आग लागल्याने २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणाच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला, तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, अपघात झालेली ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने प्रवास करत होती. त्याचवेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात घडला.
या अपघातानंतर शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस अपघाताचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले. या अपघातात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे”.
सोबतच, पंतप्रधान कार्यालयाकडून अपघातग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली आहे. या बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे".
या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.