बॉलिवूड विश्वात नवे ट्रेंड आणणारी बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनत अमान यांचे नाव घेतले जाते. ७०च्या दशकांत बॉलिवूड गाजवणाऱ्या झीनत अमान आज १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया झीनत यांच्या खासगी आयुष्याविषयी काही खास गोष्टी...
बॉलिवूडचा चेहरामोहरा बदलण्यात झीनत अमान यांचा मोठा वाटा आहे. पुरुषप्रधान चित्रपटांच्या काळात झीनत अमान यांनी चित्रपटातील अभिनेत्रीचं महत्त्व अधोरेखित केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी झीनत अमान मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होत्या. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी झीनत अमान यांनी १९७०मध्ये ‘मिस एशिया पॅसिफिक’चा ताज जिंकला होता. झीनत अमान बॉलिवूडमध्ये त्यांच्या बोल्ड स्टाईलसाठी प्रसिद्ध होत्या. व्यावसायिक आयुष्यामुळे झीनत अमान जितक्या चर्चेत राहिल्या, तितक्याच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रसिद्धी झोतात आल्या होत्या.
झीनत यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५१ साली मुंबईत झाला. त्यांची आई वर्धिनी हिंदू होती तर वडील अमानुल्ला खान हे मुस्लिम होते. झीनतचे वडील हे प्रसिद्ध पटकथा लेखक होते. त्यांनी पाकीजा, मुगल ए आझम या सारख्या हिट चित्रपटांचे संवाद लेखन केले होते. त्यामुळे झीनतने तिचे आडनाव खान ऐवजी वडीलांचे नाव अमन असे लावण्यास सुरुवात केली होती. झीनत लहान असतानाचा तिच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला होता. तिला पंचगणीला शिक्षणासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर ती लॉस एंजेलिसला गेली. पण पदवीधर शिक्षण घेत असताना मनोरंजन विश्वात काम करत असल्यामुळे तिने मुंबईत येऊन काम करण्याचा निर्णय घेतला.
झीनत अमान यांचे खासगी आयुष्य कायम चर्चेत राहिले. त्यांचे नाव देवानंदशी जोडले गेले होते. हरे राम हरे कृष्ण चित्रपटाच्या वेळी त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. पण त्याचवेळी राज कपूर देखील झीनतच्या मागे लागले होते. त्यामुळे देवानंद आणि राज कपूर यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता. त्यानंतर झीनत यांचे नाव पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी जोडण्यात आले होते. शेवटी १९७८ साली झीनत यांनी संजय खानशी गुपचूप लग्न केले. पण संजयवर मारहाणीचा आरोप करत झीनत लगेच वेगळ्या झाल्या होत्या.
वाचा: चार वर्षांनी मायदेशी परतलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे व्यवसायात पदार्पण, मुंबईत सुरू केले रेस्टॉरंट
अनेक वर्षांनंतर झीनत यांनी दुसरे लग्न केले. १९९८ साली त्यांचे पती मजहर खानचे निधन झाले. झीनत त्यांच्या अंत्यसंस्काराला देखील गेल्या नाहीत. झीनत अमान यांनी सिमी ग्रेवालच्या शोमध्ये सांगितले की 'जेव्हा त्यांच्या पतीचे निधन झाले तेव्हा त्यांच्या पतीच्या कुटुंबीयांनी मजहरला तिला भेटू दिले नाही. यामुळे झीनत या अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी जाऊ शकल्या नाही. ' त्यानंतर वयाच्या ५४व्या वर्षी त्यांनी २१ वर्षांनी लहान अमन खन्नासोबत लग्न केले. पण त्यांचा हा संसारही टिकला नाही. आज वयाच्या ७३व्या वर्षी झीनत एकट्या राहात आहेत.