छोट्या पडद्यावर सतत नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता झी मराठी वाहिनीवर लवकरच नव्या तीन मालिका सुरु होणार आहेत. त्यामध्ये ‘पारु’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या मालिकांचा समावेश आहे. त्यामधील शिवाय मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’, ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘तू चाल पुढं’ या तीन मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकांच्या जागी आता नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामधील 'शिवा' या मालिकेच्या प्रोमोची बरीच चर्चा सुरु आहे. मालिका सुरु होण्याआधीच ती बंद करण्याची मागणी प्रेक्षकांनी केली आहे. नेटकऱ्यांनी प्रोमोवर कमेंट करत बंदी घालण्याची मागणी केली आहे.
वाचा: हातात हात घालून दिसणारा कंगनासोबतचा तो ‘मिस्ट्री मॅन’ कोण ?
“भंगाचा पुढचा शब्द काय आहे?”, “छान अजून एक गटार आणली होय”, “मालिका लवकर संपवा”, “दर्जा घसरत आहे”, "यापेक्षा छोटा भीम कार्टून पाहिलेले चालेल" अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
‘शिवा’ ही मालिका ‘सिंदूरा बिंदू’ या ओडिया मालिकेचा रिमेक आहे. याआधी हिंदी भाषेत या मालिकेचा रिमेक झाला होता. ‘मीत’ असं हिंदीतल्या मालिकेचं नाव होतं. त्यानंतर आता लवकरच मराठीत ही मालिका सुरू होत आहे. अभिनेत्री पूर्वा फडके शिवाच्या भूमिकेत झळकणार आहे.