Savlyachi Janu Savali Serial Update: झी मराठी वाहिनीवर लवकरच 'सावळ्याची जणू सावली' ही नवी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत एक हटके कथा दाखवण्यात येणार आहे. तसेच मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री मेघा धाडे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या मालिकेतील सर्व कलाकार हे मालिकेचे प्रोमोशन करताना दिसत आहेत. प्रमोशन करत असताना मालिकेची ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया'ला गवसणी घातली आहे.
'सावळ्याची जणू सावली' या मालिकेची कथा सावली या आळंदी मध्ये राहणाऱ्या , रंग रूपाने साधारण पण गुणांनी असाधारण असणाऱ्या मुलीची. सावलीला दैवी सुरांची देणगी लाभलेली आहे. वडील एकनाथ आणि आई कान्हू यांच्याप्रमाणेच सावलीचीही पांडुरंगावर अपार श्रद्धा आहे. विठ्ठलाच्या सावलीत तिने श्वास घेतला त्यामुळे एकनाथने तिचं नाव सावली ठेवलंय. तिच्या आयुष्यात त्याचं स्थान अनन्यसाधारण असच आहे.
'सावळ्याची जणू सावली' या मालिकेच्या कलाकार आणि निर्मात्यांनी प्रमोशन च्या निमित्ताने पंढरपूर येथी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भेट दिली. विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि या प्रेरणादायी प्रवासासाठी आशीर्वाद घेतले. विठ्ठलाला आवडणाऱ्या तुळशीच्या पानांनी मंदिराला अप्रतिम सजावट केली होती. या ऐतिहासिक मंदिरातील केलेली ही सजावट मंदिरात उपस्थित असलेल्या भक्तांचे लक्ष वेधून घेत होती. हेच अध्यात्मिक वातावरण वाढवण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभव म्हणून पंढरपुरातील व आसपासच्या भजनीमंडळांद्वारे २५ तास अखंड भजन सेवा विठ्ठलचरणी सादर केली.
या उपक्रमाची दखल ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’ ने ही घेतली. हा उपक्रम सर्वांच्या मनात खोलवर रुजला. प्राप्ती रेडकर आणि साईंकित कामत यांच्या उपस्थितीने उपस्थित प्रेक्षक व पत्रकारांचा उत्साह वाढवला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी मालिकेबद्दल चर्चा केली आणि आजचा पंढरपूरचा अनुभव शेअर केला.
वाचा: म्हणून मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणं बंद केलं; अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं!
या मालिकेत सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, गौरी किरण अश्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या मालिकेचं अजून एक विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे या मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे एका मत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. मेघा पुन्हा मराठी डेली सोप मध्ये दिसणार आहे. कोठारे व्हिजन ची ही मालिका असून महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे या मालिकेचे निर्माते आहेत.