छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. झी मराठी वाहिनीवर अनेक वेगवेगळे विषय घेऊन निर्माते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता दोन सख्ख्या बहिणींच्या जीवनावर आधारित एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव 'सारं काही तिच्यासाठी' असे आहे.
हि गोष्ट आहे २ सख्ख्या बहिणींची ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय आणि लहान बहीण संध्या तिच्या मुली सोबत गेले २० वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे. दोघींच्या आयुष्यात २० वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या एकमेकींना कायमच्या दुरावल्या. पण म्हणतात ना रक्ताची नाती कितीही लांब गेली तरी मनातला जिव्हाळा कमी होत नाही. आजही असा एक दिवस जात नाही जेव्हा उमा आणि संध्याला एकमेकींची आठवण येत नसेल. उमाचा नवरा रघुनाथ खोत हे गावातील मोठे प्रस्थ आहे. ते स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. २० वर्षांपूर्वी रघुनाथरावांना दिलेल्या वचनाखातर उमाने आपल्या लहान बहिणीशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले.
पण समजा २० वर्ष पाळलेले वचन काही कारणामुळे उमाला मोडावे लागले तर? स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी गोष्टींचा विरोध करणारे रघुनाथ, लंडनमध्ये वाढलेल्या संध्याच्या मुलीला स्वीकरतील का? २ बहिणींमध्ये असे काय घडलेले ज्यामुळे दोघी एकमेकींना कायमच्या दुरावल्या? अशाच दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे "सारं काही तिच्यासाठी. " रघुनाथ रावांच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेते 'अशोक शिंदे' दिसणार आहेत, उमाची भूमिका साकारणार आहे खुशबू तावडे आणि संध्याच्या भूमिकेतून शर्मिष्ठा राऊत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमो पाहून या नव्या मालिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. ही मालिका २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या