सध्या मालिका विश्वामध्ये नव्या मालिकांचा धुमाकूळ सुरु आहे. जुन्या मालिका बंद होऊन अनेक नव्या मालिका सुरु होत आहे. पण या नव्या सुरु होणाऱ्या मालिकांची संख्या इतकी आहे की प्रेक्षकांचा देखील गोंधळ होताना दिसत आहे. लवकरच झी मराठी वाहिनीवर लक्ष्मीनिवास ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेविषयी उत्सुकता असताना आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी अक्षरश: संताप व्यक्त केला आहे. चला जाणून घेऊया मालिकेविषयी...
झी मराठी वाहिनीवर लवकरच 'इच्छाधारी नागीण' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत, 'येतेय 'इच्छाधारी नागीण' लवकरच आपल्या झी मराठीवर!' असे कॅप्शन देण्यात आले आहे. तसेच प्रोमोमध्ये नाग आणि नागिण शिवलिंगा जवळ एकत्र विळखा घालून असल्याचे दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर मालिकेचा हा नवा प्रोमो तुफान व्हायरल झाला आहे.
'इच्छाधारी नागीण' मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी कमेंट करत ही मालिका सुरु होण्याआधीच बंद करा असे म्हटले आहे. 'नाव ऐकूनच बघायची इच्छा निघून गेली... झी मराठीची वाट लावून ठेवलीये पूर्ण', 'झी मराठीच हे चॅनल का पाहू नये याची कारणं देतंय. काहीतरी नवीन करण्याच्या नादात काहीही करत सुटलेत', 'खरंच झी मराठी शब्द नाहीत या नव्या मालिकेसाठी', 'ह्या अशा मालिकेमुळे आहेत प्रेक्षक ते पण पाठ फिरवतील', 'हेच बाकी होतं', 'झी मराठी आपण किती अधोगती करु शकतो, ह्याचं जीवंत उदाहरण आहे हे चॅनल', 'नाही नको...असलं काहीही नको झी मराठीवर', 'झी मराठीकडून अशी अपेक्षा नव्हती', 'बास्स…एवढंच बघायचं राहिलेलं! आता आपण सगळे मरायला मोकळे' अशा अनेक कमेंट्स मालिकेच्या प्रोमोवर येत असल्याचे दिसत आहे.
काहींच्या मनात मालिकेविषयी उत्सुकता असल्याचे देखील दिसत आहे. मालिकेत कोणती अभिनेत्री दिसणार? कोणता अभिनेता दिसणार असे ही प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत. मात्र, मालिकेविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वाचा: 'कपिल शर्मा शो'मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर
काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीने 'जगधात्री' आणि 'तुला जपणार आहे' या दोन नव्या मालिकांची घोषणा केली. पण या मालिकांविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच यापूर्वी लक्ष्मीनिवास ही मालिका चर्चेत होती. त्यानंतर आता या नव्या 'इच्छाधारी नागीण' मालिकेचा प्रोमो चर्चेत आहे.