झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'अप्पी आमची कलेक्टर' पाहिली जाते. या मालिकेतील अमोल, अप्पी आणि अर्जुन हे प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. या तिघांना आनंदाने एकत्रित पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण आता 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत कथानक एका वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोलला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. पण हे कथानक पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अमोलची कॅन्सरशी झुंज सुरु आहे. त्यामुळे घरी सगळ्यांना खूप टेंशन आले आहे. अमोल म्हणतो तुम्ही रडलात तर मी लवकर जाईन, इथून पुढे प्रत्येक दिवस मी एका वर्षसारखा जगणार आहे. अमोल इतक्या भयानक आजाराशी सामना करतोय हे बघताना प्रत्येक दिवस अप्पी आणि अर्जुनसाठी कठीण जात आहे. अमोलच्या सांगण्यावरून सगळ्यांनी दिवाळी एकत्रित साजरी केली. घरात कोणालाच कामावर जायची इच्छा नाही. पण अमोल एकेकाला छडी घेऊन हाकलतो. कामाच्या ठिकाणी कुणाचेच मन लागत नाही. दिवसा अप्पी तर अर्जुन नाईट ड्यूटी घेतो. अमोलला घरच्या सगळ्यांचे दुःख कळत आहे. त्यामुळे तो ठरवतो की जाण्याआधी मी सगळ्यांचे आयुष्य सुखी करून जाणार.
केमोथेरपीचा सामना करत असताना अमोलची त्याच्या आजाराशी लढाई अधिक तीव्र होत जाणार आहे. परंतु तो प्रत्येक दिवस पूर्णपणे जगण्याचा दृढनिश्चय करत आहे. केमोथेरपीमुळे अमोलचे केस काढले जातात त्यामुळे घरच्या सगळ्यांना वाईट वाटत आहे. घरचे सगळेच पुरुष त्याच्यासोबत केस काढायला बसतात पण अमोल त्यांना थांबवतो. कॅन्सर वॉर्डमध्ये असलेली लहान मुले आणि त्यांच्या पालकांना दुःखी बघून अमोलल वाईट वाटते. तो काहीतरी शक्कल लढवून तिथले वातावरण बदलतो, सगळ्यांना खुश करतो.
वाचा: कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर; कर्जात बुडाले होते 'हे' मराठी कलाकार, पण...
झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. एका यूजरने “अरे त्या छोट्या मुलाला तरी सोडा रे… असं वाईट नका दाखवू. तो खूप लहान आहे. मालिकेमध्ये मध्ये हे पात्र करता करता त्याच्या खऱ्या आयुष्यावर याचा परिणाम होता कामा नये. त्याचं वय बघता त्याला या सगळ्या गोष्टी माहितीसुद्धा नसतील. तुम्हाला दाखवायचं आहे तर चांगलं दाखवा” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “किती वाईट दाखवत आहेत, नको वाटत आहे बघायला” असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. तर तिसऱ्या एका यूजरने, “कृपया अमोलला लवकर बरं करा” अशी कमेंट केली आहे.