Appi Amchi Collector: अप्पीच्या अपघातामुळे अमोल, अर्जुन खचून जाणार का? मालिका रंजक वळणावर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Appi Amchi Collector: अप्पीच्या अपघातामुळे अमोल, अर्जुन खचून जाणार का? मालिका रंजक वळणावर

Appi Amchi Collector: अप्पीच्या अपघातामुळे अमोल, अर्जुन खचून जाणार का? मालिका रंजक वळणावर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 22, 2025 04:17 PM IST

Appi Amchi Collector: ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत आता नवे वळण आले आहे. मालिकेतील अप्पीचा अपघात झाला आहे. त्यामुळे आता अर्जुन आणि अमोल खचून जाणार की तिचा शोध घेणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

Appi Amchi Collector
Appi Amchi Collector

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'अप्पी आमची कलेक्टर.' या मालिकेतील अप्पी, अर्जुन आणि अमोल हे सर्वांची मने जिंकताना दिसत आहेत. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात मोठे संकट आले आहे. अप्पीचा अपघात झाला आहे. त्यामुळे तिच्या अपघातानंतर अमोल आणि अर्जुन खचून जाणार की तिचा शोध घेण्यात यशस्वी होणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

अप्पीच संपूर्ण कुटुंब आसगावला पोहोचलंय. अमोलला गावात परतल्याचा खूप आनंद होतोय. तो शेतांमध्ये फिरतो आणि गावातील ओळखीच्या जागांना भेट देतो. मात्र, एका अशुभ घटनेमुळे कुटुंबाची चिंता वाढलेय. अमोलला अप्पीची आठवण येतेय आणि तिच्या विचारात अमोल गुंग आहे. त्याचवेळी, अप्पी फोन करून की ती लवकरच पोहोचत असल्याचं सांगते. अप्पी प्रवासाला निघाल्यावर तिच्या गाडीचा डोंगराळ भागात अपघात होतो, आणि ती खोल दरीत कोसळते. जेव्हा अप्पी वेळेवर पोहोचत नाही, तेव्हा संपूर्ण कुटुंब तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यांना अपघाताबद्दल समजतं, पण ते अमोलला काहीच सांगत नाहीत.

अर्जुन घटनास्थळी धावतो, तर कुटुंब अमोलला घेऊन घरी परतते. अपघाताच्या ठिकाणी अर्जुनला कळते की गाडी मोठ्या उंचावरून कोसळली आहे आणि स्फोट झाला आहे. ड्रायव्हरचा मृतदेह सापडतो, पण अप्पीचा कुठेही पत्ता लागत नाहीये. हे पाहून अर्जुन खूपच खचतो. अप्पीचा अपघात आणि तिचा शोध सुरू असल्याची बातमी गावभर पसरते आणि अखेर अमोलला ही बातमी समजते. सर्वांना भीती वाटते की अमोल कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, पण तो शांतपणे सांगतो की त्याची आई नक्की परतेल. असं बोलताना तो स्वतःला दोष देतो की आसगावला निघताना त्याने तिला सोडून का दिलं. दरम्यान, अर्जुन अप्पीचा शोध घेण्यासाठी रात्रंदिवस झटतोय.
वाचा: 'हिना खानचा कॅन्सर प्रवास हा पीआरने प्लान केला होता', अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

सगळं कुटुंब हताश झालं असताना अर्जुन मात्र आशा सोडत नाहीये. कुटुंबाला काळजी आहे की अमोल पुन्हा आजारी पडेल. संपूर्ण कुटुंब अमोलसाठी चिंतेत आहे आणि त्याला शाळेत परत पाठवण्यावर भर देतं, कारण सर्वांना वाटतंय की शाळेत गेल्याने तो हळूहळू सावरू शकेल. पण शाळेतून अमोलच्या वागणुकीच्या तक्रारी येऊ लागतात, ज्यामुळे अर्जुन अधिक चिंतीत होतो. डॉक्टरही अमोलच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करतात. अर्जुन अमोलला वचन देतो की तो अप्पीला परत आणेल. अर्जुन आपलं वचन पूर्ण करू शकेल? अमोल, अप्पूमाच्या आठवणीत खचून जाईल? असे अनेक प्रश्न आता चाहत्यांना पडले आहेत.

Whats_app_banner