गेल्या काही दिवसांपासून मालिका विश्वात वेगवेगळ्या विषयांवर आधारित नवनवीन मालिका येताना दिसत आहेत. जुन्या मालिका बंद करुन निर्मानी अतिशय वेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. आता आणखी एका नव्या मालिकेची चर्चा रंगली आहे. या मालिकेत कलाकारांची फौज दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता ही मालिका कोणती? कधी प्रदर्शित होणार? कुठे पाहायला मिळणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
झी मराठी वाहिनीवरील गेल्या काही दिवसांपासून काही नव्या मालिका सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये आणखी ही मालिकेची भर पडली आहे. या मालिकेचे नाव आहे 'लक्ष्मी निवास.' ही मालिका स्वप्न आणि भावनांनी भरलेली असणार आहे. जी स्वप्न आयुष्याच्या या टप्प्यावर पूर्ण व्हायची राहून गेली होती होती किंवा जी स्वप्न पूर्ण झाली होती त्यांना उजाळा देणारी ही मालिका आहे.
'लक्ष्मी निवास' या मालिकेत स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न बघणाऱ्या एका मध्यमवर्गीय जोडप्याची कथा दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मी एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी आहे. पण श्रीनिवासवर असलेल्या अतोनात प्रेमामुळे तिनं त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं आणि माहेरशी असलेले सगळे संबंध तिला तोडावे लागले. श्रीनिवासकडे स्वतःच्या हक्काचं घर नाही यावरुन झालेला अपमान असह्य झाल्याने तिने स्वतःचं घर होईपर्यंत माहेरी पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मी आणि श्रीनिवासचा संसार खूप सुरु आहे. तीन मुले, तीन मुली आणि सासूबाई असा लक्ष्मीचा संसार आहे.
लक्ष्मीला आता दोन मुलींची लग्न करायची आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर अनेक आव्हानं आहेत. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च, पत्रिकेत दोष असलेल्या मुलीचं लग्न जुळवणं, मुली योग्य घरी पडतायेत ना याची काळजी असणं, घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची मोट बांधून त्यांना एकत्र धरुन ठेवणं अशा एक ना अनेक आव्हानांचा सामना या जोडप्याला करावा लागत आहे. कुटुंबासाठी झटताना स्वतःच्या इच्छा मागे सारत लक्ष्मी आणि श्रीनिवासला आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं आहे.
'लक्ष्मी निवास' या मालिकेचं लेखन आहे सायली केदारने केले आहे. या मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच दररोज १ तासाचा भाग प्रक्षेपित होणार आहे. दररोज मालिकेचा १ तासाचा भाग प्रक्षेपित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही मालिका २३ डिसेंबर पासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: अभिनेत्याच्या मृत्यूला पत्नीने नाना पाटेकरांना ठरवले होते जबाबदार, नेमकं काय घडलं होतं?
'लक्ष्मी निवास' मालिके दिसणार कलाकारांची फौज. यामध्ये हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, कुणाल शुक्ल, दिव्या पुगांवकर, स्वाती देवल, निखिल राजेशिर्के, मीनाक्षी राठोड हे कलाकार दिसणार आहेत.
संबंधित बातम्या