छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवर नव्या मालिका प्रदर्शित होताना दिसत आहेत. त्यामधील काही मालिका टीआरपी यामध्ये देखील अव्वळ स्थान पटकावताना दिसत आहेत. झी मराठी वाहिनीवर १२ फेब्रुवारी रोजी दोन नव्या मालिका सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, मालिकांच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी झी मराठीकडून चूक झाली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
झी मराठी वाहिनीवर 'पारो' आणि 'शिवा' या दोन नव्या मालिका सुरु होणार होत्या १२ फेब्रुवारी संध्याकाळी साडेसात वाजता 'पारो' ही मालिका प्रदर्शित झाली. या मालिकेत शिस्तबद्ध, करारी स्वभावाच्या अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या घरात अल्लड, निरागस आणि बिंदास्त स्वभावाच्या पारोची कथा दाखवण्यात आली आहे. पारोची एण्ट्री ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. त्यामुळे आगामी भागात मालिकेत काय घडणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
वाचा: एल्विश यादवची रेस्टोरंटमध्ये हाणामारी, कानशिलात लगावतानाचा व्हिडीओ व्हायरल
'पारो' या मालिकेनंतर 'शिवा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. रात्री ९ वाजता ही मालिका प्रदर्शित होणार होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, रात्री ९ वाजता शिवा या मालिकेऐवजी पारो ही मालिका पुन्हा दाखवण्यात आली. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी झी मराठी वाहिनीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
झी मराठी वाहिनीने चुकून ९ वाजता पुन्हा पारो मालिका लावली की आणखी काही कारण होते याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण नेटकऱ्यांनी मात्र वाहिनीवर निशाणा साधला आहे. झी मराठीवाले पागल आहेत का असा सवाल या प्रेक्षकाने केला. तर, एका प्रेक्षकाने शिवा सीरियलबद्दल झी मराठीवाले विसरले वाटतं असे म्हटले.
काही वर्षांपूर्वी झी मराठीवर आलेल्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ओम म्हणजेच अभिनेता शाल्व खिंजवडेकर 'शिवा' मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच शिवा भूमिकेतच अभिनेत्री पूर्वा फडके ही मुख्य भूमिकेत दिसरणार आहे. शाल्वला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यामुळे शिवा या मालिकेची ते आतुरतेने वाट पाहात होते.
ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची दुसरी कन्या आणि अभिनेत्री मधुरा वेलणकरची बहिण मीरा वेलणकर ही देखील आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे. मीरा वेलणकर ही झी मराठीवरील 'शिवा' या नव्या मालिकेत झळकणार आहे. 'शिवा' मध्ये मीराची महत्त्वाची भूमिका आहे. मीरा वेलणकर या मालिकेतील मुख्य व्यक्तीरेखा असलेल्या आशूची आई सीताईची व्यक्तिरेखा साकारणार आहे.