Zakir Khan Show to go off Air: कॉमेडियन कपिल शर्माच्या शोची जागा झाकीर खानच्या ‘आपका अपना झाकीर’ या शोला देण्यात आली होती. या शोमधून देखील प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले जात होते. मात्र, आता अवघ्या महिनाभरात या शोचा गाशा गुंडाळला जाणार आहे. ‘सोनी वाहिनी’ने अलीकडेच आपल्या कार्यक्रमांमध्ये काही मोठे बदल केले आहेत. चॅनलने काही जुने शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात कॉमेडियन झाकीर खानचा 'आपका अपना झाकीर' या शोचाही समावेश आहे.
ऑगस्टमध्ये लाँच झालेल्या या शोला सुरुवातीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, नंतर तो अपेक्षेप्रमाणे तितकासा चालू शकला नाही. झाकीर खानच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे या शोला काही काळासाठी ब्रेक देण्यात आला होता. मात्र, आता वाहिनीने कॉमेडियनची तब्येत बरी होण्याआधीच तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभरात हा शो बंद झाला आहे.
या वाहिनीने अलीकडेच आपल्या प्रोग्रामिंगमध्ये अनेक बदल केले आहेत. गेल्या महिन्यात स्टार भारतचे गौरव बॅनर्जी यांनी सोनी नेटवर्कची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि यासोबतच वाहिनीवर अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या बदलांचा एक भाग म्हणून, चॅनलने 'काव्या: एक जज्बा', 'एक जुनून', 'पुकार दिल से दिल तक' आणि 'ज्युबली टॉकीज' या अनेक शोजची निर्मिती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिका आता त्यांचे उर्वरित भाग शूट करून नंतर आपले काम थांबवतील.
या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांचे जुने आवडते शो परत आणण्याची योजना आखली आहे. चॅनल आता 'सीआयडी' आणि 'क्राइम पेट्रोल' सारखे क्लासिक शो पुन्हा प्रसारित करत आहे. याशिवाय 'मेरे साई' हा धार्मिक शोही छोट्या पडद्यावर परतला आहे. जुने शो पुन्हा चालवण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यामुळे चॅनलचा टीआरपीही सुधारत असल्याचे बोलले जात आहे.
सध्या 'इंडियाज बेस्ट डान्सर', 'कौन बनेगा करोडपती' आणि 'इंडिया आयडॉल'चे नवीन सीझन देखील गाजणाऱ्या कार्यक्रमांमध्ये समाविष्ट आहेत. या शोना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि चॅनलचा टीआरपी टिकवून ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहेत. चॅनलच्या नवीन रणनीतीबाबत अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत आणि हे बदल भविष्यात कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे मनोरंजक ठरेल.