Zakir Hussain Life Kissa : संगीतकार उस्ताद तबलावादक झाकिर हुसेन आज आपल्यात नाहीत. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झाकीर हुसेन यांना रविवारी रात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, तेथे सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. झाकिर हुसेन यांना जगभरातील लोक उत्तम तबलावादक म्हणून ओळखतात, पण हा ठसा उमटवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. यासाठी त्यांनी लहानपणापासून रात्रंदिवस कठोर तपश्चर्या केली आणि खूप कष्ट आणि संघर्षानंतर हे स्थान मिळवले.
तबलावादक झाकिर हुसेन यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, ते जन्माला येताच त्यांचे वडील अल्ला रक्खा खान यांनी त्याच्या कानात तबल्याच्या नोट्स आणि ताल फुंकले होते. त्यांनी झाकिर यांच्या आईला सांगितले होते की, संगीत ही माझी आध्यात्मिक साधना आहे आणि ही धून आणि ताल माझ्या मुलासाठी माझी प्रार्थना आहे. झाकिर हुसेन जसजसे मोठे झाले तसतशी त्यांची तबलावादक बनण्याची इच्छा स्पष्टपणे दिसून येत होती. त्यांची तबला वादनाची आवड पाहून त्यांच्या वडिलांनी वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यांच्या रियाज घेण्यास सुरुवात केली.
झाकिर हुसेन आपल्या वडिलांसोबत पहाटे ३ ते ६ पर्यंत रियाज करायचे, ज्यामध्ये सूर, ताल आणि थाप यासोबतच त्यांना अनेक श्लोक आणि मंत्रही शिकवले जायचे. त्यांना सरस्वती आणि गणेश वंदनाही शिकवण्यात आली होती. एकीकडे झाकिर तबलावादक होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत होते. तर, दुसरीकडे त्यांची आई बावी बेगम यांना झाकिरने तबला वाजवावा, असे वाटत नव्हते. त्यांना आपल्या मुलाला म्हणजे झाकिरला डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवायचे होते. अशा परिस्थितीत झाकिर यांना तबल्यापासून दूर ठेवण्यासाठी, शाळेच्या शेवटच्या दोन वर्षांच्या काळात अभ्यासासाठी दूर पाठवण्यात आले. पण, तबला आणि झाकीर एकमेकांसाठी बनवले गेले होते. झाकिर हुसेन यांनी कधीच तबल्याची साथ सोडली नाही.
उस्ताद झाकिर हुसेन हे महान तबलावादक असण्यासोबतच उत्तम अभिनेतेही होते. त्यांनी १२ चित्रपटांमध्ये काम केले. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हीट अँड डस्ट' या ब्रिटिश चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेते शशी कपूर देखील झळकले होते. १९९८ मध्ये त्यांनी ‘सांझ’ या चित्रपटात काम केले होते. शबाना आझमी यांनीही या चित्रपटात काम केले होते.