Yogyogeshwar Jai Shankar Fame Karan-Kunal wins Award: आपल्या बोलीभाषेतील मराठी गाणी आणि मराठी मालिकांची शीर्षक गीतं फार प्रसिद्ध होत आहेत. अशाच काही लोकप्रिय मालिकांचे शीर्षक गीत आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी म्हणजे कुणाल भगत आणि करण सावंत. नुकताच त्यांना ‘कलर्स मराठी पुरस्कार सोहळ्यात 'योगयोगेश्वर जयशंकर' या मालिकेसाठी 'लोकप्रिय शीर्षक गीता'चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याआधी त्यांना 'बीग मराठी एंटरटेनमेंट' पुरस्कार सोहळ्यात 'योगयोगेश्वर जयशंकर' मालिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट शीर्षक गीताच्या' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
शिवाय संगीतकार कुणाल करण यांना 'प्रोमॅक्स इंडिया' सोहळ्यात 'बॅंड बाजा वरात' या मालिकेसाठी 'बेस्ट ओरिजनल म्युझिक वीथ लीरीक्स' असं नामांकन देखील मिळालं आहे. आतापर्यंत त्यांनी ‘महामिनिस्टर’, ‘किचन कल्लाकार’, ‘बस बाई बस’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘बॅंड बाजा वरात’, ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई?’ अशा तब्बल १४ मालिकांच्या शीर्षक गीतांना संगीतबद्ध केलेले आहे.
संगीतकार कुणाल करण पुरस्कारांविषयी बोलताना सांगतात, ‘आधी बीग मराठी एंटरटेनमेंट आणि आता कलर्स मराठी पुरस्कार सोहळ्यात 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत' आणि 'लोकप्रिय शीर्षक गीता'चा पुरस्कार मिळणे म्हणजे आमच्यासाठी स्वप्नवत आहे. एका कलाकाराला नेहमी हेच हवं असतं की, तुम्ही जे काम करता त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळावं आणि कौतुकाची थाप मिळावी. आज प्रेक्षकांच इतकं प्रेम मिळत आहे याचा खूप आनंद आहे. इंजिनीअरिंगनंतर आम्ही दोघांनी जे निर्णय घेतले की आपण आपल्याला आवडत ते काम करूया.’
‘संगीत क्षेत्रामध्ये पाऊल ठेवल्यापासून आमची स्वप्न उंचावली आहेत, आमचं कुटुंब त्या स्वप्नपूर्तीसाठी नेहमी आमच्या पाठीशी उभं असतं. या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नवोदितांना ही आम्ही सांगू इच्छितो की एखादं काम खूप मनापासून करा, ज्या क्षेत्रात काम कराल त्यात योग्य मार्ग निवडता आला पाहिजे आणि भरपूर मेहनत केली पाहिजे, मग पुढची वाटचाल खूप सोपी जाते’, असे ते म्हणाले.
‘अथांग’सारख्या प्लॅनेट मराठीच्या वेब सीरिजचं संगीत केल्यानंतर आता कुणाल-करण हिंदी चित्रपटासाठी आणि हिंदी वेब सीरिजसाठी संगीत दिग्दर्शन करत आहेत. लवकरच त्यांचे काही नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
संबंधित बातम्या