Yodha Box Office Collection Day 1: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा ‘योद्धा’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे सिद्धार्थ जाधव दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. ‘शेरशाह’नंतर सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा देशभक्तीपर चित्रपटात दिसला आहे. मात्र, या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केल्याचे दिसत आहे. 'योद्धा' या चित्रपटाने प्रेक्षकांना निराश केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा अतिशय थंड प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट जवळपास ५५ कोटी रुपये आहे. आता या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.
सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर थंड पडल्याचे दिसत आहे. सॅकनिल्कच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, ‘योद्धा’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघ्या ४.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. बिग बजेट चित्रपटाच्या दृष्टीने हा आकडा खूपच कमी आहे. मात्र, हे आकडे अंदाजे असून, यात अधिक-उणे होऊ शकतात. वीकेंडला चित्रपटाला फायदा होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या ‘योद्धा’ या चित्रपटाने ‘आर्टिकल ३७०’च्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर खूपच थंड सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘योद्धा’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अवघ्या ४ ते ५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाचे बजेट २० कोटी रुपये होते, तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ६.१२ कोटींची कमाई केली होती. मात्र, ‘योद्धा’चे बजेट अधिक असून देखील चित्रपटाला कमी प्रतिसाद मिळाला आहे.
'योद्धा' या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत राशि खन्ना, दिशा पाटनी, रोनित रॉय आणि तनुज विरवानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशि खन्ना पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसले आहेत. या दोघांनीही या चित्रपटात पती-पत्नीची भूमिका साकारली आहे. 'योद्धा'चे दिग्दर्शन पुष्कर ओझा यांनी केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा, तो प्रेक्षकांना खूप आवडला होता. परंतु, पहिल्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही. आता सगळ्यांच्या नजरा वीकेंड कलेक्शनकडे लागल्या आहेत.