Yek Number Movie Trailer: गेल्या काही दिवसांपासून 'येक नंबर' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याचे म्हटले जात होते. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली असतानाच आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा दिसणार आहे. पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
'येक नंबर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसणार का? हा चित्रपट त्यांचा बायोपिक आहे का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. आता ट्रेलर पाहून प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला असून आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात माननीय राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास दिसत आहे. प्रताप त्याचे ध्येय साध्य करू शकेल का? याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे.
ट्रेलर पाहून प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे ती, या चित्रपटात राज ठाकरे स्वतः अभिनय करणार आहेत का? तर याचे उत्तरही प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. दरम्यान, 'येक नंबर'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची झलकही दिसत आहे. त्यामुळे 'येक नंबर'मधून मलायकाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. तर सिद्धार्थ जाधवही या चित्रपटात झळकणार आहे.
वाचा: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या ऑस्कर प्रवेशाचा दावा खोटा? FFIच्या अध्यक्षांनी सांगितले सत्य
एकंदरच या सगळ्यावरूनच चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज येतोय. मराठी सिनेसृष्टीत अशा प्रकारचा चित्रपट बहुदा पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'येक नंबर'म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे असे म्हणालायला हरकत नाही. हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. 'येक नंबर'चे तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला निर्माते आहेत.