सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी खूप वेगळ्या गोष्टी करत होते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, जो चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी बस कंडक्टर म्हणून काम करायचा. मात्र, जेव्हा तो चित्रपटसृष्टीत आला, तेव्हा तो सर्वांचा आवडते कॉमेडियन बनला. या अभिनेत्याने अनेकदा चित्रपटांमध्ये मद्यपीची भूमिका साकारली होती. याच कारणामुळे त्याला इंडस्ट्रीतील सर्वात मोठा मद्यपीही म्हटले जायचे. इतकंच नाही, तर एका प्रसिद्ध व्हिस्कीच्या नावावरून या अभिनेत्याचे नाव पडले आणि त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली.
आत्तापर्यंत आपण कोणत्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, हे तुम्हाला समजले असेलच. या अभिनेत्याला चित्रपटसृष्टी आणि चाहते ‘जॉनी वॉकर’ या नावाने ओळखतात. जॉनी वॉकर यांचे खरे नाव बदरुद्दीन जमालुद्दीन होते. बदरुद्दीन हे बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होते. पण, एके दिवशी असेच बसमध्ये काम करत असताना, बदरुद्दीन जमालुद्दीन यांचं आयुष्य बदलून टाकणारा एक माणूस त्यांना भेटला.
बदरुद्दीन जमालुद्दीनचे वडील एका कारखान्यात कामाला होते. काही काळाने त्यांचा हा कारखाना बंद झाला. बदरुद्दीन जमालुद्दीनचे वडील कामाच्या शोधात मुंबईत आले होते. वडिलांना मदत करण्यासाठी बदरुद्दीन यांनी बस कंडक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. बदरुद्दीन स्वतःच्या वेगळ्या स्टाईलमध्ये तिकीट देण्याचे काम करायचे. मिमिक्री करत ते आपले काम करायचे. एके दिवशी बदरुद्दीन बसमध्ये तिकीट कापत असताना, त्याच दिवशी प्रसिद्ध अभिनेते बलराज साहनी त्या बसमधून प्रवास करत होते. बदरुद्दीन ज्या पद्धतीने तिकीट कापत होता, ते पाहून बलराज यांना खूप आनंद झाला. त्यांनी बदरुद्दीन जमालुद्दीन यांची गुरुदत्त यांच्याशी ओळख करून दिली.
गुरुदत्त यांनी बदरुद्दीनला एका मद्यपीचा अभिनय करण्यास सांगितले होते. हा अभिनय पाहून गुरुदत्त इतके खूश झाले की, त्यांनी बदरुद्दीन जमालुद्दीनला आपल्या 'बाजी' चित्रपटात कास्ट केले. त्यानंतर बदरुद्दीन जमालुद्दीन यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. बदरुद्दीन जमालुद्दीन यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये मद्यपीची भूमिका साकारली होती. त्यामुळं त्यांना इंडस्ट्रीतील सर्वात मोठा मद्यपी म्हटलं जायचं. मात्र, सत्य हे होते की, बदरुद्दीन जमालुद्दीनने अर्थात जॉनी वॉकर यांनी खऱ्या आयुष्यात कधी दारूला हातही लावला नव्हता.
बदरुद्दीन जमालुद्दीन यांना जॉनी वॉकर हे नाव गुरुदत्त यांनी दिले होते. चित्रपटांमध्ये बदरुद्दीन जमालुद्दीन मद्यपी म्हणून इतका चांगला अभिनय करायचे की, गुरुदत्त यांनी त्यांचं नाव जॉनी वॉकर ठेवलं. जॉनी वॉकर व्हिस्कीचा प्रसिद्ध ब्रँड आहे. असे म्हटले जाते की, ही व्हिस्की गुरुदत्त यांच्या सर्वात आवडत्या व्हिस्कीपैकी एक होती.