Chhaava Movie Scene Clash : नुकताच विकी कौशलच्या 'छावा' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या झलकेसाठी सगळेच प्रेक्षक आसुसलेले होते. मात्र, हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक आपला तीव्र संताप जाहीर करू लागले. या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेता विकी कौशल नाचताना आणि लेझीम खेळताना दाखवण्यात आला होता. हे दृश्य पाहून प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अखेर यावर आता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी प्रतिक्रिया देत, हा सीन काढून टाकणार असल्याचे म्हटले आहे.
'छावा' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अशाप्रकारे नाचताना दाखवणे कुणालाच पटलेले नाही, यावर अनेक प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला. मात्र, आता या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकतीच लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्याला काही बहुमूल्य सल्ले दिल्याचे लक्ष्मण उतेकर यांनी म्हटले आहे. 'छावा' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून, यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सगळ्यांना दाखवायचा आहे. मात्र, जर एखादं-दुसरी गोष्ट लोकांच्या रागाला कारणीभूत ठरत असेल आणि त्यामुळे चित्रपटावर परिणाम होणार असेल, तर अशी गोष्ट चित्रपटातून काढून टाकण्यास आम्ही फार विचार करणार नाही', असे त्यांनी म्हटले. 'राज ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महराज आणि इतिहासाविषयी सखोल अभ्यास आहे. त्यामुळे काय दाखवलं पाहिजे आणि काही नाही दाखवलं पाहिजे यावर त्यांनी चांगला सल्ला दिला आहे. यासोबतच काही सूचना केल्या आहेत', असे ते म्हणाले.
'कुणाच्याही भावना दुखावल्या जाव्यात, असा आमचा अजिबात हेतू नव्हता. जर कोणाच्या भावना अजाणतेपणे दुखावल्या गेल्या असतील, तर क्षमा. हा या चित्रपटाचा एक केवळ छोटासा भाग आहे. त्या गाण्याशी किंवा त्या दृश्याशी चित्रपटाचा फारसा काही संबंध नाही, त्यामुळे ते काढून टाकण्यात आम्हाला काहीही वावगं वाटणार नाही. या चित्रपटाचं एक विशेष स्क्रीनिंग करणार आहोत. या चित्रपटाची संपूर्ण टीम या चित्रपटावर गेली चार वर्षे काम करत आहे. छत्रपती संभाजी महाराज काय होते, ते या संपूर्ण जगाला कळू दे, हाच या मागचा उद्देश होता. छत्रपती संभाजी महाराज एक राजा म्हणून, एक योद्धा म्हणून किती पराक्रमी होते, हे संपूर्ण जगाला दाखवून द्यायचं म्हणूनच या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. मात्र, अशा एक-दोन गोष्टी असतील, ज्या या चित्रपटाला गालबोट लावत असतील, तर त्या काढून टाकण्यास आम्हाला काहीही हरकत नाही', असे लक्ष्मण उतेकर म्हणाले.
या चित्रपटाची कथा शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या कादंबरीवर आधारित आहे. 'छावा' हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कथानक नेमकं काय असावं, त्याच्यात काहीही गोंधळ होऊ नये, म्हणून अधिकृतरित्या 'छावा' या कादंबरीचे अधिकार विकत घेण्यात आले. या कादंबरीत देखील म्हटलं की, छत्रपती संभाजी महाराज हे होळीचा उत्सव अतिशय जल्लोषात साजरी करायचे. या उत्सवात ते स्वतः देखील सामील व्हायचे. म्हणून आम्ही चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांना लेझीम खेळताना दाखवलं. लेझीम आपला पारंपारिक खेळ आहे, याच्यात कुठलाही विक्षिप्तपणा किंवा विचित्रपणा नाही. यामुळे जर शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील, तर लेझीम खेळ त्याहून मोठा नक्कीच नाही, त्यामुळे आम्ही तो सीन नक्कीच डिलीट करू, अशी ग्वाही लक्ष्मण उतेकर यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या