बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्स हे गेल्या कित्येक वर्षांपासून पदार्पण करत आहेत. पण त्यांना यश मिळेल असे नाहीच. स्टारकिड्सला देखील प्रचंड संघर्ष करावा लागतो. ते त्यांच्या पालकांइतके यशस्वी होतील असे नाही. आई-वडिलांना दूर ठेवून स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करण्यात काही स्टारकिड्सला यश मिळाले आहे तर काही अपयशी ठरले आहेत. या यादीमध्ये दिग्गज निर्माते यश चोप्रा यांचा धाकटा मुलगा उदय चोप्राचा देखील समावेश आहे. आज ५ जानेवारी रोजी उदयचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या विषयी काही खास गोष्टी...
उदय चोप्रा हा दिग्गज चित्रपट निर्माते यश चोप्रा व पामेला चोप्रा यांचा धाकटा मुलगा आहे. उदयने आपल्या वडिलांचे प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्म्सने निर्मिती केलेल्या सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने २००० मध्ये ‘मोहब्बते’ या चित्रपटातून पदार्पण केले. यात जिमी शेरगिल, शाहरुख खान, शमिता शेट्टी, ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन अशी तगडी स्टारकास्ट होती. अभिनयात येण्यापूर्वी उदयने ‘लम्हे’, ‘डर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘दिल तो पागल है’ आणि इतर चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या चित्रपटानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. तो एक फ्लॉप अभिनेता ठरला.
वाचा: जेव्हा श्रीदेवीच्या निधनाचा फोन आला तेव्हा काय होती प्रतिक्रिया? जान्हवी कपूरने केला खुलासा
२०१३ मध्ये आमिर खान, अभिषेक बच्चन आणि कतरिना कैफ स्टारर ‘धूम ३’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. नंतर त्याने अभिनय सोडला. त्याचे हिट झालेले बहुतांशी चित्रपट हे मल्टी-स्टारर होते. त्यानंतर त्याने चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. उदय चोप्राने २०१२ मध्ये योमिक्स लाँच केले. त्याअंतर्गत त्याने ‘धूम’, ‘हम तुम’, ‘एक था टायगर’ आणि ‘दया प्रोचू’ या चार कॉमिक मालिका तयार केल्या. सध्या तो वायआरएफ एंटरटेनमेंटचा सीईओ आहे, ही हॉलिवूड आधारित निर्मिती कंपनी आहे. उदयच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ९००० कोटी रुपये आहे. त्यांचे तीन प्रॉडक्शन हाऊस आहेत. त्याच्याकडे ५० कोटी रुपयांची संपत्ती आहे.