'झिरो'च्या अपयशानंतर चार वर्षे काम का केले नाही? शाहरुख खानने अभिनयाच्या ब्रेकवर सोडले मौन-why shah rukh khan take 4 years break reason is here ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'झिरो'च्या अपयशानंतर चार वर्षे काम का केले नाही? शाहरुख खानने अभिनयाच्या ब्रेकवर सोडले मौन

'झिरो'च्या अपयशानंतर चार वर्षे काम का केले नाही? शाहरुख खानने अभिनयाच्या ब्रेकवर सोडले मौन

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 15, 2024 10:54 AM IST

Shahrukh Khan: २०१८मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या झिरो या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. या चित्रपटानंतर शाहरुख जवळपास चार वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर राहिला. आता अभिनेत्याने त्या मागचे कारण सांगितले आहे.

Shahrukh Khan
Shahrukh Khan

किंग खान म्हणून बॉलिवूड अभिनेता शाहरुख ओळखला जातो. त्याचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट झिरो २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास चार वर्षे शाहरुख खान मोठ्या पडद्यावर दिसला नाही. त्यावेळी झिरोच्या अपयशामुळे शाहरुख खानने अभिनयातून माघार घेतल्याचे बोलले जात होते. शाहरुखने या ब्रेकवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखने ब्रेक घेण्यावर मौन सोडले आहे.

शाहरुखने ब्रेक का घेतला?

शाहरुखने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शाहरुख खानने ब्रेक घेण्याच्या निर्णयाचा चित्रपटाच्या अपयशाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. 'व्यावसायिक सिनेमाच्या निकषांवर तो जास्तीत जास्त वैविध्यपूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याच्यासोबत, ती गाणी, नृत्य, भांडणे आणि भावना असायला हव्यात. पण तरीही आपण नवीन काही सांगू शकतो का असा माझा प्रयत्न असतो? त्यामुळे मी जे काही सिनेमे करतो, मग तो जब हॅरी मेट सेजल असो किंवा झिरो किंवा फॅन असो, जे बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत त्यांचा देखील समावेश आहे. मला हे चित्रपट मनोरंजक वाटले होते तसे मला ते खूप आवडले होते' असे शाहरुख म्हणाला.

ब्रेकबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला की, 'हे झिरोच्या अपयशामुळे झालेले नाही. मी नेहमी म्हणतो की, ज्या दिवशी मला सकाळी उठून शूटिंग करावेसे वाटत नाही, त्या दिवशी मी काम करत नाही. चित्रपटाच्या अपयशामुळे नाही, खरं सांगायचं तर मी जानेवारीत चित्रपट करणार होतो आणि तो डिसेंबरमध्ये होता. माझ्याकडून हे खूप अनप्रोफेशनल झाले. मी एक दिवस उठलो आणि म्हणालो की मला या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जायचे नाही.'
वाचा: शाहरुख, आमीर आणि सलमान खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची कंगनाची इच्छा, म्हणाली 'दाखवून देईन...'

एक वर्षासाठी घेतला ब्रेक

शाहरुखने पुढे सांगितले की, त्याने एक वर्षासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. शाहरुखने चित्रपटाच्या निर्मात्याला सांगितले की, तो आपला चित्रपट करू शकणार नाही. कारण त्याला वर्षभर काम करायचे नव्हते. यावर निर्मात्याने सांगितले होते की, तुम्ही एक वर्षाचा ब्रेक घेत आहात हे शक्य नाही, तुम्ही एक मिनिटही रिकामे बसत नाही, त्यामुळे तुम्हाला चित्रपट आवडला नसेल तर नकार द्या, पण तुम्ही ब्रेक घेत आहात असे म्हणू नका. दीड वर्षांनंतर त्याच निर्मात्याने पुन्हा शाहरुख खानला फोन केला आणि सांगितले की, तू खरंच काम करत नाहीस याचे मला खूप आश्चर्य वाटत आहे.