Amruta Khanvilkar: सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकरमध्ये का नाही मैत्री? कारण आले समोर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amruta Khanvilkar: सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकरमध्ये का नाही मैत्री? कारण आले समोर

Amruta Khanvilkar: सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकरमध्ये का नाही मैत्री? कारण आले समोर

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Aug 30, 2023 01:35 PM IST

Sai Tamhankar: अमृता खानविलकरने एका शोमध्ये मोठा खुलासा केला आहे. “मी सई ताम्हणकरची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला, पण…”

Sai Tamhankar and Amruta Khanvilkar
Sai Tamhankar and Amruta Khanvilkar

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील दोन नावे म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकर. मात्र दोघींमध्ये चांगली मैत्री नसल्याचे नेहमी बोलले जाते. त्या दोघी कधीही एकत्र येताना देखील दिसत नाहीत. आता अमृताने एका शोमध्ये त्या दोघींमध्ये काय बिनसले आहे हे सांगितले आहे.

अमृताने छोट्या पडद्यावरील अतिशय हिट शो 'खुपचे तिथे गुप्ते'मध्ये नुकताच हजेरी लावली. या शोचे गायक अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत आहे. अवधूत आणि अमृतामध्ये चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. त्याने अमृताला तिच्या खासगी आयुष्याविषयी देखील अनेक प्रश्न विचारले. दरम्यान त्याने अमृताला 'सई ताम्हणकरचा फोटो दाखवला आणि तिच्याबद्दल काय वाटतं,' असा प्रश्न विचारला.
वाचा: 'जवान'मधील नवे गाणे प्रदर्शित, काय आहे प्रेक्षकांची प्रतिक्रिया

त्यावर अमृताने “सई ताम्हणकर एक अभिनेत्री म्हणून मला खूप आवडते. असे अनेकदा झाले आहे की मी तिची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला. पण मला समोरुन तसा प्रतिसाद मिळाला नाही” असे उत्तर दिले. त्यानंतर लगेच अवधूतने “काही भांडण वैगरे झाले होते का?” असे विचारले. त्यावर लगेच अमृताने “नाही नाही, अजिबात नाही. आता आपण एका सिनेसृष्टीत काम करतो, पण म्हणून आपण अगदीच सगळ्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतो, असे नाही”, असे म्हटले.

काही वर्षांपूर्वी अमृता आणि सईमध्ये चांगले नाते असल्याचे म्हटले जात होते. त्यांचे एकत्र फिरतानाचे देखील फोटो समोर आले होते. मात्र, त्या दोघींमध्ये वाद झाला आणि मैत्रित फूट पडल्याचे समोर आले.

Whats_app_banner