बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. तिचा 'पंचक' हा चित्रपट ५ जानेवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्माती माधुरी आणि तिचा पती श्रीराम नेने आहेत. दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये श्रीराम नेनेंनी अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर पुन्हा भारतात येण्याचा निर्णय का घेतला? या मागिल कारण सांगितले.
श्रीराम नेने आणि माधुरीने नुकताच एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “मी २० वर्षे हार्ट सर्जरी करत होतो आणि प्रत्येक दिवसाला मी तीन ते पाच केसेस सांभाळत होतो. फायदा खूप होता आणि रिवॉर्ड्सही खूप होते. माझे खूप रुग्ण बरे झाले, ते पाहून मलाही छान वाटायचे. पण डॉक्टर होण्यापूर्वी मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सगळे टेक्नॉलॉजीचे काम करत होतो. मला २०११ मध्ये वाटले की भारताला माझी खूप गरज आहे, त्यामुळे मी तिथून इथे आलो.”
वाचा: यंदाची मकर संक्रांत माधुरी दीक्षितसोबत साजरी करायची? जाणून घ्या कशी
नेनेंनी घेतलेल्या निर्णयानंतर माधुरी आणि त्यांच्या पालकांची काय प्रतिक्रिया होती? असे देखील त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर नेनेंनी, “मी इथे यायचा निर्णय घेतल्यावर माझ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या आई-वडिलांना धक्का बसला. कारण मी एका हॉस्पिटलचा हेड होतो. एका वर्षात ५०० केस सांभाळत होतो आणि ते सगळे सोडून मुंबईला यायचे. पण आता त्यांना कळले की मी हेल्थकेअर, शिक्षण आणि चित्रपटांसाठी कंपन्या बनवल्या आहेत. आम्ही मुलांनाही सांगितलंय की तुम्हाला हवं ते करा. आमची मुले आमच्या दोघांच्या क्षेत्रापैकी कुठे जाणार माहिती नाही” असे उत्तर दिले.
या मुलाखतीमध्ये माधुरीने देखील भारतात परण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, 'मुले तिथे (अमेरिकेत) एका वेगळ्याच वातावरणात वाढतात, त्यामुळे भारतात लोक कसे जगतात हे त्यांना कळावे म्हणून परत येण्याचा निर्णय घेतला होता.'