Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jheel Mehta: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने नुकताचा १५ वर्षांचा मोठा टप्पा पार केला आहे. या मालिकेचे ४०००हुन अधिक भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा मिळवली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे जितके प्रेम मिळाले, तितकेच प्रेम या मालिकेतील कलाकारांना देखील मिळाले. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील सगळीच पात्र खूप लोकप्रिय आहे. १५ वर्षांच्या या प्रवासात अनेक कलाकारांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेऊन प्रेक्षकांना धक्का दिला होता. या मालिकेतून बाहेर पडणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री झील मेहता हिचे नाव देखील सामील आहे. अभिनेत्री झील मेहता हिने या मालिकेत ‘सोनू भिडे’ ही भूमिका साकारली होती.
अभिनेत्री झील मेहता हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत पहिल्या भागापासून ‘सोनू भिडे’ ही भूमिका साकारली होती. अनेक वर्ष ती या मालिकेतून सोनू म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. मात्र, काही वर्षांनंतर तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. ‘सोनू’च्या भूमिकेतून झील मेहता हिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मात्र, तरीही तिने मालिकेतून बाहेर पडण्याच निर्णय घेतल्याचे कळताच चाहत्यांना धक्का बसला होता. झील मेहताने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडल्यावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. झील मेहता हिला वाढत्या उंचीमुळे मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचे म्हटले जात होते. मात्र, इतक्या वर्षांनंतर आता झीलने पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे.
झील मेहता मालिकेतून बाहेर पडल्यावर, यामागे अनेक कारणं सांगितली गेली. इतकेच नाही तर, तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले होते, असे देखील म्हटले होते. आता पुन्हा एकदा झील या मालिकेत दिसू शकते, असे देखील म्हटले जात आहे. मात्र, या सगळ्यावर झील मेहता हिने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. एका नव्या व्लॉगच्या माध्यमातून तिने यावर उत्तर दिले आहे. यापुढे कधीही मालिकेत झळकणार नसल्याचे देखील तिने यावेळी स्पष्ट केले आहे.
झील मेहता म्हणाली की, ‘अनेकदा मला मालिकेत परत दिसणार का असा प्रश्न विचारला जातो. मात्र, मी पुन्हा या मालिकेत परतणार नाही. टीव्हीवर काम करणं हे माझं बालपणीचं स्वप्न होतं. ते पूर्ण देखील झालं. मात्र, १०वीच्या वेळी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी मालिका सोडली. माझ्या उंचीमुळे मला मालिकेतून काढलं गेलं ही केवळ अफवा आहे. आता मी पुन्हा मनोरंजन विश्वात येऊ इच्छित नाही. मी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे.’