मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘शक्तिमान’ने अद्याप लग्न का नाही केलं? कारण सांगताना अभिनेते मुकेश खन्ना म्हणाले....

‘शक्तिमान’ने अद्याप लग्न का नाही केलं? कारण सांगताना अभिनेते मुकेश खन्ना म्हणाले....

Jun 20, 2024 09:23 AM IST

सगळ्यांचेच लाडके ‘शक्तिमान’ म्हणजे अभिनेते मुकेश खन्ना हे ६५ वर्षांचे असून त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. आता मुकेश खन्ना यांनी स्वतः यामागचं कारण सांगितलं आहे.

‘शक्तिमान’ने अद्याप लग्न का नाही केलं?
‘शक्तिमान’ने अद्याप लग्न का नाही केलं?

‘महाभारत’ मालिकेत ‘भीष्म पितामह’ची भूमिका साकारून आजही सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते मुकेश खन्ना हे नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आता लग्न न करण्याविषयी मनमोकळेपणाने सांगितले आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केली होती. यात त्यांनी म्हटलं, लोक त्यांना सतत विचारतात की त्यांनी लग्न का केले नाही. ‘भीष्म पितामहां’च्या व्रतामुळं त्यांचं लग्न होत नाही का? यावर अभिनेत्याने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भीष्म पितामहांची प्रतिज्ञा हेच कारण आहे का? 

मुकेश खन्ना यांनी नुकताच सोशल मीडियावर आपल्या भीष्म पितामह पात्राचा आणि स्वतःच्या फोटोचा कोलाज शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, ‘भीष्म प्रतिज्ञा एखाद्याचे लग्न थांबवू शकते का? लोकांना वाटतं की माझ्यासोबत असं घडलं आहे. मला असं वाटत नाही! लग्न म्हणजे दोन आत्म्यांचे मिलन आहे, असे माझे मत आहे. कदाचित मला तो आत्मा अजून सापडलेला नाही. कदाचित तुम्हाला माझं म्हणणं कळेल.’

प्रेग्नेंसीमुळे ट्रोल झाल्यानंतर दीपिका पदुकोणने शेअर केला बेबी बंपचा पहिला फोटो; अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मातृत्वाचं तेज

त्यांनी पुढे लिहिले की, ‘लोकांचा असाही विश्वास आहे की, तुमच्या जितक्या जास्त गर्लफ्रेंड्स असतील, तितका तुमचा पुरुषार्थ मोठा! पण, माझा तसा विश्वास नाही. बायको पतिव्रता असावी, अशीही लोकांची धारणा आहे. नवराही ‘बायकोप्रिय’ असावा असं माझं मत आहे. पण एवढं नक्की, माझं लग्न भीष्म प्रतिज्ञेने थांबवलेलं नाही.’

रणवीर बनणार नवा शक्तिमान!

अभिनेते मुकेश खन्ना त्यांच्या ‘शक्तिमान’ या व्यक्तिरेखेमुळे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांचा 'शक्तिमान' हा शो अगदी लहान-मोठ्यांपासून सगळ्यांनाच आवडला होता. भारतातला पहिला टीव्ही सुपरहिरो अशी त्याची ओळख झाली होती. आजही लोक या शोचे भाग इंटरनेटवर बघताना दिसतात. आता 'शक्तिमान'वर एक चित्रपट बनत आहे, ज्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह 'शक्तिमान' बनणार आहे. मात्र, मुकेश खन्ना यावर खूश नाहीत. केवळ स्टारडममुळे ही व्यक्तिरेखा चालेल असं नाही, असे मत मुकेश खन्ना यांनी मांडले आहे. सुपरहिरो असलेल्या ‘शक्तिमान’मध्ये भारतीय मूल्ये आणि शिकवण देणाऱ्या सुपरहिरोची प्रतिमाही असायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.

WhatsApp channel