संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा.' घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा सहकुटुंब हसू या म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करीत आलेली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा.' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यापैकी एक कलाकार म्हणजे गौरव मोरे.
आपल्या विनोदी शैलीमुळे फिल्टरपाड्याचा बच्चन अल्पावधीतच प्रसिद्धीझोतात आला. आपल्या विनोदबुद्धीने तो प्रत्येकाला पोट धरून हसायला भाग पाडतो. छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यावर गौरव चित्रपटांकडे वळला. त्याने नुकतीच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पामस्ती पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबद्दल त्याने अनेक खुलासे केले.
वाचा: 'कुर्बान'मधील सैफसोबतच्या सेक्स सीनविषयी करीनाने सोडले मौन
भार्गवीने गौरवला विचारले की, “तू ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडलीस?” यावर अभिनेता म्हणाला, “हा कार्यक्रम मी सोडलेला नाही. माझ्या खांद्याला दुखापत झाली असल्याने मी थोडे दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे. सध्या या दुखापतीमुळे मी दोन ते तीन महिन्यांच्या ब्रेकवर आहे. कारण, एखादं स्किट सादर करताना ओढाताण होते. माझे स्किट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता माहितीच असेल की, माझ्या सगळ्या स्किटमध्ये मारधाड असते. सतत हालचाल केल्यामुळे खांदा अधिक दुखू शकतो. हेच हास्यजत्रेतून ब्रेक घेण्याचे मूळ कारण आहे. याशिवाय या दरम्यान माझ्या एका चित्रपटाचे शूटिंग सुद्धा होते. त्याच्यासाठी मला ३० ते ३५ दिवसांचा वेळ काढावा लागणार आहे.”
पुढे तो म्हणाला की “दुखापत आणि सलग शूटिंग या दोन कारणांमुळे मी काही दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे. तीन महिन्यांचा ब्रेक घेतो असे मी सरांना आधीच सांगून ठेवले आहे. खांदा बरा होईपर्यंत आरामच करेन अन्यथा हे दुखणे असेच वाढत जाणार.”