Prajakta Mali PC : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन सध्या बीड प्रकरणात तीचं नाव घेणाऱ्या आमदार सुरेश धस आणि तशाच मथळ्यांनी बातम्या करणाऱ्या माध्यमांवर ताशेरे ओढले. यावेळी तिने माध्यमांना आणि राजकीय नेत्यांना खडसावून काही प्रश्न विचारले. सध्या प्राजक्ता माळी हिला मनोरंजन विश्वातून पाठिंबा मिळत आहे. मात्र, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी प्राजक्ताने आधीच यावर बोलायला हवं होतं, असं मत मांडलं आहे. त्यांनी नुकतीच या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
परभणी जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. मात्र, आता हे प्रकरण वेगळ्या वळणावर जात आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत धनंजय मुंडे यांच्याशी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा संबंध जोडल्याने मराठी मनोरंजन विश्वातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात झाली असतानाच, प्राजक्ता माळीला या वादात ओढले जात आहे, ज्यामुळे विविध कलाकारांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील यावर आता आपलं मत मांडलं आहे.
या वादावर प्रतिक्रिया देताना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दीपाली सय्यद म्हणाल्या की, 'संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांवर आता जी परिस्थिती ओढवली आहे, त्यांच्या या दुःखात मी सहभागी आहे. देशमुख यांना न्याय मिळेल अशी आशा होती, आणि यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. मात्र, या प्रकरणाने आता वेगळं वळण घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात कलाकारांची नावं उगाच ओढली जात आहेत. प्राजक्ता माळीने नुकतीच रडत पत्रकार परिषद घेतली, तेव्हा तीचं दुख:द सगळ्यांना दिसलं. ती महाराष्ट्राची आवडती कलाकार आहे, तिचं मत मांडण्याचा अधिकार तिला आहे. '
दीपाली पुढे म्हणाल्या की, 'प्राजक्ता माळी हिने आता पत्रकार परिषद घेऊन आपलं दुःख मांडलं. पण,तिने रडायला नको होते. जेव्हा करुणा मुंडे यांनी प्राजक्ताचं नाव घेतलं, तेव्हा तिने त्यावर तत्काळ त्यावर प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होते. तिने स्पष्टपणे विचारले पाहिजे होतं की, 'मी असं काय केलं की तुम्ही माझं नाव घेत आहात?' सुरेश धस चुकीचे आहेत. त्यांनी संतोष देशमुख यांच्यासाठी लढा सुरू केला. पण, त्यात त्यांनी कलाकारांची नावं घेऊन चूक केली.'
'कलाकारांची नावे घेतली जातात, कारण त्यांच्या नावाशी ग्लॅमर जोडलेलं असतं आणि त्यामध्ये मीडिया देखील रस घेते.मात्र, असे आरोप करण्यापूर्वी पुरावे सादर करायला हवेत. अशाप्रकारे कुठेही कलाकारांची नावे घेणे उचित नसल्याचे, दीपाली सय्यद यांनी म्हटले.
संबंधित बातम्या