बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातून रणदीप हुड्डा याने वीर सावरकरांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर मांडले. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची मोठी चर्चा रंगली होती. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासोबतच रणदीप हुड्डा याने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. मात्र, सुरुवातीला या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. मात्र, जसजसा या चित्रपटाचा वेळ सरकला, तसतसं या चित्रपटातून काही व्यक्तींनी काढता पाय घेतला. यातच महेश मांजरेकर यांचं नाव देखील सामील होतं. महेश मांजरेकर यांनी हा चित्रपट अर्ध्यात सोडला होता. यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या. महेश मंजरेकरांनी हा चित्रपट का सोडला? असा प्रश्न देखील सगळ्यांना पडला होता. यावर आता महेश मांजरेकर यांनी उत्तर दिलं आहे.
महेश मांजरेकर यांनी नुकत्याच ‘लोकसत्ता’ला दिलेल्या एका मुलाखतीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सोडण्यावर मोठा खुलासा केला आहे. हा चित्रपट सोडण्यामागचं कारण देखील महेश मांजरेकर यांनी सांगितलं आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रणदीप हुड्डा याने स्वतः केले आहे. मात्र, सुरुवातीला या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर सांभाळणार होते. त्यांनी अर्ध्यातूनच हा चित्रपट सोडला. यानंतर अनेक उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. याबद्दल रणदीपला देखील प्रश्न विचारले गेले होते. मात्र, त्याने नेहमीच यावर उत्तर देणे टाळले. दरम्यान, महेश मांजरेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत यावर मौन सोडले आहे.
याबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, ‘वीर सावरकर चित्रपटाला मी न्याय देऊ शकलो नसतो, तर चित्रपट मी का बनवायचा? त्यात जर रणदीप हुड्डा नसता, तर मी उत्तम चित्रपट बनवला असता. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की, रणदीपने वीर सावरकरांबद्दल वाचले नाही का? तर, नाही तसं मुळीच नाहीये. त्याने माझ्यापेक्षा अधिक सावरकर वाचले. पण, प्रॉब्लेम असा होता की, त्याने सावरकर जरा जास्तच वाचले. मला हा चित्रपट करायचा होता. मी हा चित्रपट का सोडला असता? पण, अशी काही परिस्थिती निर्माण झाली की, मला हा चित्रपट सोडावा लागला.’
एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत महेश मंजरेकर म्हणाले की, ‘हा चित्रपट ज्यांनी केला त्यांना या चित्रपटाची फार काही घेणं देणं नव्हतं. मला सावरकरांविषयी खूप आकर्षण आहे. मला नेहमी वाटायचं की, सावरकरांवर एखादा चित्रपट करायला हवा. एक दिवस संदीप सिंह माझ्याकडे हा चित्रपट घेऊन आला. यातील सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीपला घ्यायचं असं ठरलं. मात्र, त्यावेळी रणदीपला सावरकर काळे की गोरे हे देखील माहित नव्हते. नंतर त्याने या भूमिकेसाठी संपूर्ण इतिहास वाचून काढला. सुरुवातीला रणदीपला वाटलं की, सावरकर खलनायक आहेत. मग, मी त्याला समजावलं की, आधी तू सगळं वाचून काढ.’
महेश मांजरेकर म्हणाले की, ‘या चित्रपटाची ७० टक्के स्क्रिप्ट ही माझी आहे. पहिल्याच वाचनाच्या वेळी तो सांगू लागला होता की, त्याला चित्रपटात अनेक बदल हवे आहेत. त्यानंतर तो असाच वारंवार हस्तक्षेप करू लागला. त्यामुळे स्क्रिप्टवर निर्णय होत नव्हता. शूटिंग लांबलं होतं, पैसे वाया जात होते. अखेर वैतागून मीच निर्मात्यांना म्हणालो की, एक तर हा चित्रपट रणदीपला करू द्या किंवा मी करतो. कारण तो दिग्दर्शनाच्या प्रक्रियेत सतत हस्तक्षेप करत होता. या चित्रपटादरम्यान रणदीपला कधीच भेटता देखील यायचं नाही. तो नेहमी सावरकरांच्या वेशात बसलेला असायचा, अशावेळी मी त्याच्याशी कधी संवाद साधायचा? यानंतर मला सतत वाटू लागलं होतं की, तो मुद्दाम आणि जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करत होता. शेवटी मीच निर्मात्याला सांगितलं की, तुम्ही त्याचीच निवड करा. कारण मला जसा चित्रपट बनवायचा आहे, तो या अभिनेत्यासोबत होऊ शकत नाही.’