Singer Abhijeet Bhattacharya : गेल्या काही दिवसांपासून गायक अभिजीत भट्टाचार्य चर्चेत आला आहे. शाहरुख खानच्या एका गाण्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. प्रसिद्ध गायिका दुआ लिपा हिने तिच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानचं एक गाणं गायलं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांनंतर ते मूळ गाणं गाणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यने एक पोस्ट लिहून मनातील खंत व्यक्त केली होती.
गायक अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानसाठी अनेक गाणी गायली, जी पुढे खूप गाजली. ‘तौबा तुम्हारे ईशारे’, ‘वो लडकी जो सबसे अलग है’ या गाण्यांना तर खूप प्रतिसाद मिळाला . मात्र, नंतर अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानसाठी गाणी गाणं बंद केलं. दोघांमध्ये नेमकं काय झालं होतं, हे आता समोर आलं आहे. १९९०-२०००च्या दशकात या दोघांमध्ये काही वाद झाले होते. आपल्याला आपल्या कामाचे श्रेय दिले जात नाही, असे अभिजीत भट्टाचार्यला वाटले होते. एएनआयशी बोलताना अभिजीतने शाहरुखसाठी गाणे का थांबवले हे सांगितले.
अभिजीत भट्टाचार्य म्हणाला, 'जेव्हा स्वाभिमान दुखावला जातो, तेव्हा 'पुरे झाले' असे म्हणावेसे वाटते. मी त्याच्यासाठी (शाहरुख) गात नव्हतो; मी माझ्या कामासाठी गात होतो. पण जेव्हा मी पाहिले की तिथे सर्वांना ओळख मिळत होती. अगदी सेटवर चहा देणाऱ्या चहा विक्रेत्याला देखील… पण गायकाला ओळख मिळत नव्हती. तेव्हा मला वाटलं ‘मी त्यांचा आवाज का व्हावं?’
यानंतर शाहरुख खान आणि अभिजीत भट्टाचार्य यांच्यात गाण्याचं क्रेडिट घेण्यावरून थोडंसं वाजलं. त्यानंतर दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाकलं. मतभेद असूनही अभिजीतने आपली कोणतीही तक्रार नसल्याचे म्हटले. ‘माझे शाहरुखसोबतचे नाते तुटले असे नाही, पण शाहरुख आता इतका मोठा स्टार झाला आहे की, तो आता फक्त एक सामान्य व्यक्ती राहिलेला नाही. कदाचित आपण कोणत्या स्तरावर पोहोचलो आहोत, हे त्यालाही माहीत नसेल. मग मी त्याच्याकडून कशाला अपेक्षा ठेवू? मी अजूनही तोच व्यक्ती आहे, जो मी आधी होतो; मी माझ्या पद्धतीने वाढत आहे. मी त्याच्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठा आहे. तो ६०च्या वर आहे आणि मीही ६०च्या वर आहे. कुणालाही कुणाची माफी मागायची गरज नव्हती. आम्हा दोघांमध्ये अहंकार आहे. मला त्याची किंवा त्याच्या समर्थनाची गरज नाही,’ असे गायक म्हणाला.
दरम्यान, अलीकडेच ब्रिटीश पॉप स्टार दुआ लिपा हिने एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ‘बादशाह’च्या ‘वो लडकी जो सबसे अलग है’ या गाण्यासोबत तिच्या गाण्याचे मॅशअप केले. हा परफॉर्मन्स भारतात ट्रेंडिंग विषय बनला असताना, अभिजीतचा मुलगा जय भट्टाचार्य याने टीका केली, ज्याने त्याच्या वडिलांना श्रेय न दिल्याबद्दल गायकावर टीका केली होती.
संबंधित बातम्या