छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने तब्बल दहा वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. गेल्या काही दिवसांपूर्वीच टीआरपीचं कारण देऊन हा शो ऑफ एअर झाला. मात्र, हा कार्यक्रम बंद झाल्याने अनेक चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली होती. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचे झाले होते. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे या सगळ्यांनीच आपल्या दमदार विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. मात्र, ‘चला हवा येऊ द्या’सारखा पोट धरून हसायला लावणारा शो बंद झाल्यानंतर प्रेक्षक नाराज झाले होते. परंतु, काहीच दिवसांत निलेश साबळेने ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नावाचा एक नवीन शो जाहीर केला. मात्र, त्याच्या या शोमध्ये जुन्या संचातील कुठलेच कलाकार दिसत नसल्याने, सगळेच प्रेक्षक चकित झाले होते. यावर आता निलेश साबळेने स्पष्टीकरण दिले आहे.
निलेश साबळे याने त्याचा नवीन शो ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ जाहीर केल्यावर प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते या शोच्या प्रोमोमध्ये निलेश साबळेसोबत भाऊ कदम दिसल्यावर आता पुन्हा एकदा जुनी टीम नव्याने प्रेक्षकांना हसवणार, असं सगळ्यांनाच वाटत होतं. मात्र, ज्याप्रमाणे या शोची वाहिनी बदलली त्याचप्रमाणे या शोची स्टारकास्ट देखील बदलली आहे. निलेश साबळेच्या या नव्या कार्यक्रमात श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे किंवा कुशल बद्रिके यांपैकी एकही जण नाही. केवळ भाऊ कदम हा एकच जुना चेहरा पुन्हा एकदा प्रेक्षकांना दिसत आहे.
कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमात ‘चला हवा येऊ द्या’तील जुने कलाकार का नाहीत, त्यावर आता निलेश साबळेने भाष्य केले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ प्रमाणेच ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाचे लेखन आणि सूत्रसंचालन निलेश साबळेच करत आहे. या निमित्ताने निलेश साबळे याने नुकतीच एका युट्युब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना प्रेक्षकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. या मुलाखतीच्या वेळी त्याला विचारण्यात आलं की, ‘तुमच्या या कार्यक्रमांमध्ये जुने कलाकार का नाहीत? किंवा या कार्यक्रमाच्या पुढील भागांमध्ये श्रेया, भारत किंवा कुशल यांपैकी कोणी पाहायला मिळतील का?’
यावर उत्तर देताना निलेश साबळे म्हणाला की, ‘हा कार्यक्रम पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे या कार्यक्रमात तुम्हाला सगळे नवीन कलाकार बघायला मिळत आहेत. श्रेया, भारत आणि कुशल हे कमालीचे कलाकार आहेत. मात्र, सध्या काही तांत्रिक बाबींमुळे आम्ही एकत्र येऊ शकत नाही. याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम जेव्हा थांबणार होता, तेव्हा तो काही महिन्यांसाठी ब्रेक घेणार होता. त्यामुळे मी नवीन काहीतरी करू असा निर्णय घेतला होता. पण, त्यावेळी वाहिनीने आमच्याबरोबर एक वर्षाचा करार केला. या करारावर ज्यांनी सही केली ते सध्या त्याच वाहिनीबरोबर काम करत आहेत. पण, आम्ही सही न केल्यामुळे काहीतरी नवीन करू शकत आहोत.’