अवघ्या मनोरंजन विश्वाची लाडकी ‘चंद्रा’ म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर ही नेहमीच चर्चेत असते. केवळ मराठीच नाही तर तिने हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी अमृता खानविलकर नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. अमृताच्या ग्लॅमरस लूकचे लाखो चाहते जगभरात आहेत. ती अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ देखील शेअर करत असते. दरम्यान सध्या अनेक कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशाच एका मुद्द्यावर आता अमृता खानविलकर हिने भाष्य केलं आहे. अमृता खानविलकर हिच्या लग्नाला आता बरीच वर्ष झाली आहे. मात्र, अभिनेत्री आपल्या पतीसोबत फोटो शेअर करताना दिसत नाही. यावर तिला अनेकदा प्रश्न देखील केले जातात.
अमृता खानविलकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही देखील अनेकदा चर्चेत राहिली आहे. अमृता खानविलकर हिने हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली आहे. मात्र, अमृता कधीच पती हिमांशू मल्होत्रासोबत फोटो शेअर करत नाही, यावर तिला बरेच जण प्रश्न विचारताना दिसतात. आता आपण नवऱ्याबरोबर फारसे फोटो का शेअर करत नाही, यावर अमृता खानविलकर बोलली आहे. या मुलाखतीत बोलताना अमृता म्हणाली की, ‘मला नेहमी वाटते आमचे सगळे चाहते हे आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. यातही काही लोकांना तुम्ही आवडता, तुमच्या गोष्टी पटतात. पण, काही लोक असेही आहेत, ज्यांना तुम्ही आवडत नाही. असे लोक जोपर्यंत तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळा-ढवळ करत नाही, तोपर्यंत सगळं काही ठीक वाटतं.’
‘पण माझं काम पहिल्यानंतर किंवा माझे कुटुंबासोबतचे फोटो पाहिल्यानंतर जेव्हा हे असे लोक सोशल मीडियावरच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला वाईट बोलू लागतात, तेव्हा वाईट वाटतं. जेव्हा ते मला आणि माझ्या कुटुंबाला किंवा हिमांशूला ट्रोल करायला लागतात, ते मला अजिबात आवडत नाही. त्यामुळेच मी त्याच्याबद्दल फार काही पोस्ट करत नाही. कारण, मला त्याला किंवा माझ्या कुटुंबाला या मनःस्तापात ढकलायचं नाही. कोणत्याही प्रकारच्या ट्रोलिंगला तो अजिबात पात्र नाही. या सगळ्या प्रकारामुळे त्याला दु:ख होऊ शकतं. म्हणूनच मी याची काळजी घेते आणि ती यापुढेही घेत राहीन.’
पुढे बोलताना अमृता खानविलकर म्हणाली की, ‘हिमांशुसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नसल्यामुळे अनेकदा मला ट्रोल केलं जातं. पण, मी माझ्या आई-बाबांना पाहते, जे गेल्या ४५ वर्षांपासून आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. त्या दोघांचाही फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर एकही फोटो नाही. मलाही तेच करायचं आहे. हा मीही थोडी जुन्या विचारसरणीची आहे. आम्ही दोघे एकमेकांना तेव्हा पासून ओळखतो, जेव्हा इन्स्टाग्राम अस्तित्वातच नव्हतं. त्यामुळे आम्हाला एकमेकांची ओळख जपायची आहे.’