Yogesh Mahajan Death Reason : टीव्ही अभिनेते योगेश महाजन यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून याला दुजोरा दिला आहे. रिपोर्टनुसार, रविवारी अभिनेता त्याच्या 'शिव शक्ती : तप, त्याग, तांडव' या मालिकेच्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचला नव्हता. शोमधील त्यांचे सहकलाकार आणि क्रू मेंबर्सना यामुळे त्यांची काळजी वाटू लागली होती. ते अभिनेत्याला भेटण्यासाठी उमरगाव येथील त्याच्या फ्लॅटवर गेले होते. त्यांनी फ्लॅटचा दरवाजा ठोठावला असता कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, अभिनेते योगेश बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. त्यांनी तत्काळ अभिनेत्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हृदयविकाराच्या झटक्याने या अभिनेत्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 'शिवशक्ती तप त्याग तांडव'व्यतिरिक्त योगेशने 'अदालत', 'जय श्रीकृष्ण', 'चक्रवर्ती अशोक सम्राट' आणि 'देवों के देव महादेव' या टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. यासोबतच योगेशने 'मुंबईचे शहाणे' आणि 'संसारची माया' या मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
योगेश महाजन यांची सहअभिनेत्री आकांक्षा रावत यांनी इंडिया टुडेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ते अतिशय हसमुख व्यक्ती होते. त्यांची विनोदबुद्धीही खूप चांगली होती. आम्ही एकत्र चित्रीकरण करून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या क्षणी आपण सगळेच हादरून गेलो आहोत. योगेशच्या जाण्याने त्याच्या पत्नीला धक्का बसला आहे. तरुण मुलाच्या डोक्यावरून त्यांचं पितृछत्र हरपलं आहे.’
योगेशच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्याने आपल्या मेहनतीने टीव्ही इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला होता. मनोरंजन क्षेत्रात आपला पाय रोवण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे छोट्या छोट्या भूमिकांमध्ये काम केले. 'शिवशक्ती-तप, त्याग, तांडव' या मालिकेत हा अभिनेता शुक्राचार्यांची भूमिका साकारत होता. 'मुंबईचे शहाणे' आणि 'संसाराची माया' यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये केलेल्या कामामुळे योगेश महाजनला खूप पसंती मिळाली होती.
याआधी काही दिवसांपूर्वीच एका साऊथ अभिनेत्याचा देखील असाच मृत्यू झाला होता. शूटिंगसाठी एक हॉटेल रूममध्ये थांबलेल्या अभिनेत्याचा तिथेच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा असेच प्रकरण समोर आले आहे.
संबंधित बातम्या