Saif Ali Khan Viral Video : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर आज पहाटे त्याच्या वांद्रे येथील घरी घरफोडी दरम्यान हल्ला झाला. दरोड्याच्या प्रयत्नादरम्यान त्याच्यावर सहा वेळा वार करण्यात आले होते, त्यानंतर त्याला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी लीलावती रुग्णालयात आणण्यात आले होते. नुकतीच सध्या शस्त्रक्रिया सुरू आहे. सैफ या हल्ल्याआधी त्याची लेक सारा अली खान हिच्यासोबत दिसला होता. मुलगी सारा अली खानसोबत मुंबई विमानतळावर सैफने फोटो पोज दिल्या होत्या. बाप लेकीच्या या जोडीचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सैफ अली खान आणि सारा अली खान रविवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. एका तरुण बीटबॉक्सरने त्यांना थांबवून आपली कला सादर केली. सैफ आणि सारा या तरुण मुलाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी थोडावेळ थांबले आणि यावेळी चाहतेही त्यांच्याभोवती जमले. सैफने तरुणाच्या खांद्यावर थाप मारली आणि त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. निघण्यापूर्वी सैफने आपल्या मुलीला मिठी मारली आणि निरोप घेताना बाप-लेकीचा हळवा बंध बघायला मिळाला.
एकीकडे सैफ रुग्णालयात असताना आता करीना कपूरचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री चिंतेत दिसत आहे. ही घटना घडल्यानंतरचा हा व्हिडिओ असून,यात करीना दिसत आहे. पापाराझी तिला क्लिक करत असताना, ती तिच्या घरातील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसत आहे. या दरम्यान करीना तिचा मोबाईल फोन अनेक वेळा तपासत असताना अस्वस्थ झालेली दिसत आहे.
सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या टीमने निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या घरात एक चोर चोरीच्या प्रयत्नात घुसला होता. यावेळी मोलकरणीने चोराला पाहून आरडाओरडा सुरू केला. त्याचा आवाज ऐकून सैफ बाहेर आला आणि त्यांच्यात आणि चोरामध्ये बाचाबाची झाली. यामध्ये चोरट्याने अभिनेत्यावर चाकूने हल्ला केला, त्यामुळे तो जखमी झाला.
या अज्ञात चोरासोबत झालेल्या झटापटीत सैफ अली खानला अनेक वेळा चाकू मारण्यात आल्याच्या बातमीने चाहते आणि चित्रपटसृष्टी चिंतेत पडली आहे. मुंबई पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘अभिनेता सैफ अली खानच्या घरात एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. अभिनेता आणि घुसखोर यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी झालेल्या हल्ल्यात अभिनेता जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तपास सुरू आहे.’ मुंबईतील वांद्रे भागात सैफ अली खानच्या घरी मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेची टीम तैनात आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. हल्ल्याचा तपास सुरू असल्याने पोलिसांनी स्निफर डॉगही आणले आहेत.
संबंधित बातम्या