बॉलिवूडमध्ये अनेक दशकांची कारकीर्द गाजवणारा सुपरस्टार शाहरुख खान आजही भारत आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र, शाहरुखला ही प्रसिद्धी मिळवणे अजिबातच सोपे नव्हते. जगाचा लाडका सुपरस्टार बनण्याचा त्याचा मार्ग अनेक अडचणींनी भरलेला होता. शाहरुख खान याने टेलिव्हिजनमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. चित्रपटांमध्ये संधी मिळविण्यासाठी सुरुवातीच्या दिवसांत त्याने खूप संघर्ष केला. बॉलिवूड अभिनेत्री आणि शाहरुखची जवळची मैत्रीण जुही चावला हिने शाहरुखच्या इंडस्ट्रीतील संघर्षाच्या दिवसांचा एक किस्सा शेअर केला आहे.
गुजरातमधील जीसीसीआयच्या एका कार्यक्रमात बोलताना जुही चावलाने शाहरुख खानच्या मुंबईतील सध्याच्या आलिशान जीवनशैलीची तुलना त्याच्या स्ट्रगलच्या काळातील सामान्य दिवसांशी केली. भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणे, चित्रपट क्रूसोबत जेवण करणे आणि कमीत कमी पैसे खर्च करून जगणे, वेगवेगळ्या चित्रपटांच्या सेटवर थांबून काम करणे, अशा अनेक गोष्टी शाहरुख खान याने केल्या होत्या.
या कार्यक्रमात बोलताना ‘कयामत से कयामत तक' फेम अभिनेत्रीने जुही चावला हिने सांगितले की, स्ट्रगलच्या काळात शाहरुख खानकडे एकच कार होती, जी त्याने ईएमआय करून विकत घेतली होती. परंतु, त्यावेळी शाहरुख खान ईएमआय न भरू शकल्यामुळे बँकेने ती कार ताब्यात घेतली होती. ‘शाहरुख खानकडे एक जिप्सी होती, तिचा ईएमआय भरण्यासाठी तो २-३ शिफ्ट करायचा. पण, तरीही त्याच्याकडे पुरेसे पैसे जमत नव्हते. ईएमआय भरता न आल्याने बँकेने अखेर त्याची गाडी उचलून नेली होती. पण आता त्याच्याकडे बघा…’, असा एक किस्सा जुही चावलाने या कार्यक्रमात सांगितला.
या घटनेमुळे शाहरुख खान खूपच हताश झाला होता. पण, जुही चावलाने एक दिवस त्याच्या घराबाहेर अशा अनेक कार उभ्या असतील, असे म्हणत त्याला धीर दिला होता. जुही चावला त्यावेळी शाहरुखला म्हणाली होती की, ‘काळजी करू नकोस, तुझ्याकडे एक दिवस अशा अनेक कार असतील. जुही पुढे म्हणाली की, ’माझी ही गोष्ट त्याला आजही आठवते. कारण ती खरी ठरली आहे. आज त्याच्याकडे बघा, किती गाड्या आहेत.' आऊटसाइडर म्हणून सुरुवात करूनही शाहरुख खानने मनोरंजन विश्वात खूप प्रसिद्धी मिळवली आणि बॉलिवूडमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. आजघडीला शाहरुखकडे लक्झरी गाड्यांचा ताफा आहे आणि तो मुंबईतील वांद्रे येथील ‘मन्नत’ या भव्य आलिशान बंगल्यात राहतो.
ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि रिअल लाईफ फ्रेंडशिपसाठी ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खान आणि जुही चावला यांनी ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘डुप्लिकेट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. शाहरुख खान आणि जुही चावला यांचे पती जय मेहता हे इंडियन प्रीमियर लीगच्या अर्थात आयपीएलची सुपरहिट फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) मालक आहेत. दोघांनी २००८ मध्ये तब्बल २६२.५ कोटी रुपयांमध्ये फ्रँचायझी खरेदी केली होती.
संबंधित बातम्या