राज कपूर हे बॉलिवूडमधील अतिशय नावाजलेले नाव. ते लोकप्रिय अभिनेते-दिग्दर्शक होते, त्यांनी भारतीय सिनेमात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे चित्रपट आजही सिनेरसिकांचे मनोरंजन करतात. पण राज कपूर ज्या प्रकारे त्यांच्या सिनेमांमुळे लाइमलाइटमध्ये असायचे त्याच प्रकारे खासगी आयुष्याचीही चर्चा सुरु असायची. विवाहित असलेल्या राज कपूर यांचे एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अफेअर सुरु होते. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या पत्नीला कळाली तेव्हा नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...
राज कपूर यांचे कृष्णा कपूर यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतरही त्यांचे काही अभिनेत्रींसोबत अफेअर्स सुरु होते. राज कपूर यांचे दिवंगत सुपूत्र ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात काही घटनांचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात त्यांनी वडील राज कपूर यांचे वैजयंतीमाला यांच्याशी अफेअर असताना आईने काय केलं होतं ते सांगितलं होतं.
ऋषी कपूर यांनी पुस्तकात वडिलांच्या अफेरचा उल्लेख करत लिहिले की, “माझ्या वडिलांचे नर्गिससोबत अफेअर होते. तेव्हा मी खूपच लहान होतो आणि त्यामुळे या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. मलाही त्यामुळे घरात काही घडल्याचे आठवत नाही. पण मला आठवतं की बाबांचे वैजयंतीमाला यांच्याशी अफेअर होते हे जेव्हा आईला कळाले, तेव्हा ती मला घेऊन मरीन ड्राईव्हवरील नटराज हॉटेलमध्ये शिफ्ट झाली होती.”
पुढे ते म्हणाले की, “माझ्या आईने यावेळी माघार न घेण्याचा निर्णय घेतला होता. हॉटेलमध्ये काही दिवस राहिल्यानंतर आम्ही दोन महिन्यांसाठी चित्रकूटमधील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो. माझ्या वडिलांनी आई आणि आम्हा सर्वांना राहाता यावे म्हणून एक अपार्टमेंट विकत घेतलं होतं. त्यांनी आई परत यावी यासाठी प्रयत्न केले. पण त्यांनी जोपर्यंत आयुष्यातील तो चॅप्टर संपवला नाही, तोवर आईने हार मानली नाही.”
वैजयंतीमाला यांनी राजकपूर यांच्या सोबतच्या अफेअरच्या गोष्टी नेहमीच फेटाळल्या. ते पाहून आईला प्रचंड राग आला होता, असं ऋषी कपूर यांनी या पुस्तकात लिहिलं आहे. “काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका मुलाखतीत वैजयंतीमाला यांनी माझ्या वडिलांबरोबर कधीच अफेअर नव्हतं असा दावा केला होता. माझ्या वडिलांना प्रसिद्धीची भूक होती, त्यामुळे या गोष्टी पसरवल्या असंही त्या म्हणाल्या होत्या. मला फार राग आला होता. त्या असं कसं म्हणू शकतात. त्यांना या गोष्टी बोलण्याचा अधिकार नव्हता. कारण स्वतःची बाजू मांडण्यासाठी माझे वडील तेव्हा जिवंत नव्हते.”
वाचा: महेश कोठारेंनी शरद तळवकरांना दिली होती 'धुमधडाका' सिनेमातून काढून टाकण्याची धमकी, काय होते कारण?
राज कपूर आणि वैजयंतीमाला यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सर्वात आधी १९६१ मध्ये आलेल्या ‘नजराना’ चित्रपटात ते दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांनी राज कपूर दिग्दर्शित ‘संगम’ सिनेमामध्ये पुन्हा एकत्र काम केले. या चित्रपटात राजेंद्र कुमार देखील दिसले होते.
संबंधित बातम्या