मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्राजक्ताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. प्राजक्ताच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. नुकताच प्राजक्ताला एका मुलाखतीमध्ये लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्राजक्ताचा लवकरच ‘तीन अडकून सीताराम’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे ती जोरदार प्रमोशन करताना दिसते. दरम्यान तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ' खऱ्या आयुष्यात प्रेमात केव्हा पडणार आणि कधी बेडीत अडकणार?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्राजक्ताने “प्रेक्षकांना मी सांगेन वाट बघा… सध्या मी माझ्या आयुष्याच्या प्रेमात आहे. प्रत्येकाने स्वत:वर प्रेम करणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी कोणा दुसऱ्याच्या प्रेमात का पडायचे? तुम्ही स्वत:वर प्रेम करा” असे म्हटले.
वाचा: प्राजक्ता माळीने किसिंग सीन दिलेल्या ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर पाहिलात का?
पुढे ती म्हणाली, “कोणत्याही बेडीत अडकणं हे माझ्या मूळ स्वभावात नाही आहे. बेडीत किंवा बंधनात अडकणं हे माझ्या स्वभावाच्या विरोधात आहे. त्यामुळे सध्या मी प्रत्येक गोष्टीसाठी वेळ घेईन.”
‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात प्राजक्ता माळीसोबतच वैभव तत्तवादी आणि आलोक राजवाडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.