Sai Tamhankar-Siddharth Chandekar Friendship: अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हटके नाव आणि हटके कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सई आणि सिद्धार्थ पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. मनोरंजन विश्वात दोघांची मैत्री सर्वश्रुत आहे. सईच्या जवळच्या मित्रांच्या यादीत सिद्धार्थ चांदेकर याचं नाव देखील सामील आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सई आणि सिद्धार्थ वेगवेगळ्या मुलाखती देताना दिसत आहेत. यातील एका मुलाखतीत सईने सिद्धार्थच्या रिलेशनशिपवर आपली पहिली प्रतिक्रिया कशी होती, ते सांगितलं आहे.
नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सई हा किस्सा सांगताना म्हणाली की, ‘मला आठवतं तेव्हा सिद्धार्थने पहिल्यांदाच मितालीसोबतचा एक सेल्फी शेअर केला होता. तेव्हा मी त्याला मस्करीत चिडवणारा रिप्लाय दिला होता. सिद्धार्थसोबत मितालीला पाहून मला असं वाटलं की, ही? ही सिद्धार्थची गर्लफ्रेंड आहे? कारण मी आणि मितालीने एका मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यामुळे मी मितालीला ओळखत होते. तेव्हा मिताली अगदीच लहान होती. १०-१२ वर्षांची छोटीशी मिताली मला आठवतेय. याचं आणि मितालीचं कधी आणि कसं काय जुळलं असेल? असा प्रश्न मला पडला होता.’
पुढे सई ताम्हाणकर म्हणाली की, ‘अर्थात ती सिद्धार्थची पसंत होती. आणि माझं म्हणाल तर माझ्या मित्रांनी नेहमी खुश राहावं अशीच माझी इच्छा असते. त्यामुळे मी सिद्धार्थला पहिला प्रश्न हाच केला की, तू खुश आहेस ना? मग बाकी सगळं ठीक आहे. म्हणजे माझं माझ्या मित्रांवर इतकं प्रेम आहे की, जर ते पाप करून आले तरी मी त्यांना पाठीशी घालेन. त्यामुळे मला सिद्धार्थबद्दल पण तेच वाटलं. सिद्धार्थसोबत देखील घट्ट मैत्री असल्याने मी काही त्याला फार प्रश्न केले नाहीत. आणि मिताली लहान असताना का होईना पण मी तिला ओळखत होते. त्यामुळे मला तर याचा खूप आनंदच होता.’
'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटात सई ताम्हणकर व सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यांचा हा चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुलभा आर्या या ‘फिल्मी आज्जी’च्या भूमिकेत झळकणार आहेत. सई आणि सिद्धार्थसोबत या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.
संबंधित बातम्या