मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर पोलीस व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी; प्राथमिक चौकशीत काय आढळलं?-what mumbai police said on malaika father anil arora death after preliminary investigation ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर पोलीस व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी; प्राथमिक चौकशीत काय आढळलं?

मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर पोलीस व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी; प्राथमिक चौकशीत काय आढळलं?

Sep 11, 2024 05:03 PM IST

Anil Arora death investigation : मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाची समजताच मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले असून प्राथमिक चौकशी पूर्ण केली आहे.

मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येची बातमी समजताच पोलीस घटनास्थळी; प्राथमिक चौकशीनंतर म्हणाले...
मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येची बातमी समजताच पोलीस घटनास्थळी; प्राथमिक चौकशीनंतर म्हणाले...

Malaika Arora father news : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी मुंबईतील राहत्या घराच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येची बातमी समजताच मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

ऐन गणेशोत्सवात अनिल अरोरा यांच्या आत्महत्येची बातमी आल्यामुळं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. मलायका, तिची बहीण अमृता अरोरा व इतर अनेक सेलिब्रिटींनी अनिल अरोरा यांच्या वांद्रे येथील घरी धाव घेतली. ही क्षणातच ही बातमी सगळीकडं पसरली. त्यानंतर मुंबई पोलिसांतील काही अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.

सर्व बाजूंनी तपास सुरू

मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्यानं या घटनेबाबत मीडियाला माहिती दिली. 'अनिल अरोरा सहाव्या मजल्यावर राहत होते. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं दिसतंय. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळं या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीम तपासासाठी इथं पोहोचली आहे. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

मलायका लहान असतानाच अनिल अरोरा व मलायकाची आई जॉयस पॉलीकार्प यांचा घटस्फोट झाला होता. वडिलांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा मलायका घरी नव्हती. ती पुण्यात होती. ती लगेचच मुंबईला परतली. 

हा अपघात असावा!

मीडियातील वृत्तानुसार, मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केलेली नसावी, हा अपघात असण्याची शक्यता आहे. त्यांना कोणताही आजार नव्हता किंवा आत्महत्येचं पाऊल उचलण्यासारखं इतर काहीही कारण नव्हतं. त्यामुळं सगळेच हैराण झाले आहेत.

आई-वडिलांच्या घटस्फोटावर काय म्हणाली होती मलायका?

आई-वडील वेगळे झाल्यामुळं मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. 'माझं बालपण खूप छान गेलं, पण ते सहज-सोपं नव्हतं. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतरचा काळ कठीण होता. त्यातून महत्त्वाचे धडे शिकले. मला माझ्या आईचं एका नव्या आणि वेगळ्या दृष्टिकोनातून निरीक्षण करता आलं. मी कठोरपणे काम करण्याची नैतिकता शिकले आणि स्वत: स्वतंत्र होण्यासाठी जे काही करावं लागेल ते शिकले. ते सुरुवातीचे धडे माझ्या आयुष्याचा आणि व्यावसायिक प्रवासाचा पाया आहेत. मी अजूनही पूर्णपणे स्वतंत्र आहे. मी माझ्या स्वातंत्र्याची कदर करतो आणि माझ्या अटींवर जीवन जगते, असं ती म्हणाली होती.

 

(डिस्क्लेमर: आत्महत्येचं वृत्त विचलित करणारं ठरू शकतं. मात्र, आत्महत्या रोखता येतात. त्यासाठी काही हेल्पलाइन आहेत. दिल्लीतील सुमैत्री येथे ०११-२३३८९०९० आणि चेन्नईतील स्नेहा फाऊंडेशनशी ०४४-२४६४००५० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)

Whats_app_banner
विभाग