Mamta Kulkarni On Tv Show : बॉलिवूड अभिनेत्री ते महामंडलेश्वर ममता कुलकर्णी नुकतीच एका टीव्ही शोमध्ये दिसली. यावेळी अभिनेत्रीने बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्रीआणि रामदेव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अभिनेत्री म्हणाली की, रामदेव बाबांनी महाकाल आणि महाकालीची भीती बाळगावी. धीरेंद्र शास्त्री यांच्याबद्दल बोलताना ममता कुलकर्णी पुढे म्हणाली की, ‘त्यांचे जितके वय आहे, तेवढीच तपश्चर्या मी केली आहे.’ नुकतीच ममता कुलकर्णीने अभिनयातून निवृत्ती घेऊन किन्नर आखाड्यात रुजू झाली होती. तिला महामंडलेश्वर ही उपाधी देण्यात आली होती. या निर्णयावर अनेक धर्मगुरूंनी नाराजी व्यक्त केली. आता तिच्याकडून ही पदवी काढून देखील घेतली गेली आहे.
ममता कुलकर्णी हिला महामंडलेश्वर बनवले, तेव्हा योगगुरू बाबा रामदेव म्हणाले होते की, ‘एका दिवसात कोणीही संतपद प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे तपश्चर्या करावी लागते. हल्लीच मी बघितले की, ते कुणाचंही हात धरून त्यांना महामंडलेश्वर बनवत आहेत. तसे होत नाही.’ बागेश्वर धामचे अधिष्ठाता पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही आपली नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, ‘कोणत्याही प्रकारच्या बाह्य प्रभावाखाली कोणाला संत किंवा महामंडलेश्वर कसे बनवले जाऊ शकते? ज्याला संत किंवा साध्वीची भावना आहे, त्यालाच ही पदवी द्यायला हवी.’
ममता कुलकर्णी नुकतीच 'आप की अदालत' या टीव्ही शोमध्ये दिसली होती. यावेळी पत्रकार रजत शर्मा यांनी बाबा रामदेव आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या या धारदार वक्तव्यांवर अभिनेत्रीला प्रश्न विचारला असता अभिनेत्री म्हणाली की, आता मी रामदेव बाबांना काय सांगू, त्यांनी महाकाल आणि महाकालीची जरा तरी भीती बाळगावी.
तर, ममता कुलकर्णी यांनी धीरेंद्र शास्त्री यांना उत्तर देताना म्हटले की, 'ते नॅपी धीरेंद्र शास्त्री आहेत, त्यांचे वय जेवढे अर्थात २५ वर्षे आहे, तितकीच मी तपश्चर्या केली आहे. मला धीरेंद्र शास्त्रींना एक गोष्ट सांगायची आहे की, मी कोण आहे हे तुमच्या गुरूंना विचारा आणि शांत बसा. "
ममता कुलकर्णीने २०००च्या दशकाच्या सुरुवातीलाच बॉलिवूडपासून दूर जाण्यास सुरुवात केली होती. मात्र, २०१६ मध्ये, तिचे नाव एका मोठ्या ड्रग तस्करी प्रकरणात समोर आले होते, ज्यामध्ये तिचा कथित पती विकी गोस्वामीचे नाव देखील सामील होते. विकी आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत होते. या वादामुळे ममताने भारत सोडला आणि आधी दुबई आणि नंतर केनियात राहू लागली होती.
संबंधित बातम्या