Mushtaq Khan Kidnapping : नुकतेच कॉमेडियन सुनील पाल यांचे अपहरण झाले होते, त्यानंतर मनोरंजन विश्वात खळबळ उडाली होती. आता सुनील पाल यांच्या ऑडिओमुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता मुश्ताक खान यांचेही अपहरण झाल्याची बातमी मंगळवारी सायंकाळी मिळाली. या बातमीनंतर आता विनोदी कलाकारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना बॉलिवूडसाठी मोठा धक्का असून, त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नेमकं काय झालं, जाणून घ्या.
बॉलिवूड अभिनेते मुश्ताक खान यांचे अपहरण करून खंडणी मागण्यात आली होती. ही घटना २० नोव्हेंबर रोजी दिल्ली विमानतळावरून सुरू झाली. यावेळी मुश्ताक खान यांना मेरठमध्ये एका सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी कार पाठवून बोलावण्यात आले होते. पण, हा सगळा या कारस्थानाचा भाग होता. कारण गाडी मेरठऐवजी दिल्लीच्या बाहेर वळली. इतकेच नाही तर, अपहरणकर्त्यांनी अभिनेत्याला ओलीस ठेवले आणि तब्बल १२ तास अत्याचार केले.
मुश्ताक खान यांचे बिझनेस पार्टनर शिवम यादव यांनी या घटनेची माहिती दिली आणि अभिनेत्याला १२ तास कशाप्रकारे ओलिस ठेवले होते, हे सांगितले आहे. अपहरणकर्त्यांनी त्याच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, ते संपूर्ण रक्कम देऊ शकले नाहीत. तेव्हा, त्यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या बँक खात्यातून २ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
या संपूर्ण घटनेबाबत शिवम यादव यांनी पुढे सांगितले की, मुश्ताक खान यांच्याकडे विमानाचे तिकीट, बँक हस्तांतरणाची माहिती आणि विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज असे पुरावे आहेत. शिवम यांनी बिजनौरमध्ये एफआयआर दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर मुश्ताक खान यांना मोठा धक्का बसला आहे.
या घटनेने मनोरंजन विश्वात एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, अलीकडेच कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणाची अशीच एक घटना घडली होती. दोन्ही घटनांमध्ये सारखेच साम्य दिसून येत असून, या दोन्ही घटनांमागे एकाच संघटित टोळीचा हात असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
यासोबतच कलाकारांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बॉलिवूडचे कॉमेडियन कलाकार खरोखरच अपहरणकर्त्यांचे लक्ष्य का बनत आहेत, ज्यांना पैसे देण्याच्या बहाण्याने कार्यक्रमांना आमंत्रित केले जाते आणि नंतर अशा घटना घडवून आणल्या जातात, याचा तपास पोलिस करत आहेत.
संबंधित बातम्या