Sayani Gupta Shocking Revelations : नेटफ्लिक्सची वेब सीरिज 'फोर मोर शॉट्स प्लीज' फेम अभिनेत्री सयानी गुप्ता नेहमीच चर्चेत असते. सयानीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पडद्यावरील इंटिमेट सीन्समागचं काळं सत्य सांगितलं आहे. तिने असा दावा केला आहे की, एकदा तिच्या एका सहकलाकाराने इंटिमेट सीनदरम्यान तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच नाही, तर सहकलाकाराने तिच्यासोबत काय काय केलं हेही सयानीनं सांगितलं.
सयानी गुप्ताने रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, एका इंटिमेट सीन दरम्यान दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तिचा सहकलाकार थांबला नाही. तो तिला किस करत राहिला. अभिनेत्री म्हणाली, ‘अनेक जण इंटिमेट सीन्सचा खूप गैरफायदा ही घेतात. सीन म्हटल्यानंतरही एखादा अभिनेता किस करत राहिल्याच्या घटना माझ्यासोबत अनेकदा घडल्या आहेत. असे वागणे अभिनेत्याला शोभत नाही.’ यावेळी सयानीने आणखी एक धक्कादायक किस्सा सांगितला.
गोव्यात 'फोर मोर शॉट्स प्लीज'च्या पहिल्या सीझनचं शूटिंग सुरू असताना तिला एक अतिशय अवघड सीन शूट करावा लागला होता. या सीनचा किस्सा सांगताना सयानी म्हणाली की, 'मला समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर शॉर्ट ड्रेसमध्ये झोपावं लागलं होतं आणि माझ्यासमोर क्रूसह जवळपास ७० लोक तिथे होते. त्यावेळी मला खूप असुरक्षित वाटत होतं. तुम्ही फक्त अशी कल्पना करा की, आपण एक अतिशय छोटासा ड्रेस परिधान केला आहे, ज्यात आपलं अंगही झाकलं जात नाहीये, तो घालून तुम्ही झोपला आहात आणि तुमच्यासमोर ७० माणसे उभी आहेत.'
सयानीने आजवर अनेक वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन चित्रित केले आहेत. मात्र, यातील काही अनुभव आपण आजही विसरू शकत नसल्याचे ती म्हणते. याविषयी बोलताना सयानी गुप्ता म्हणाली की, ‘मी आता इंटिमेट सीन्सवर एक अक्खं पुस्तक लिहू शकते. पण, मी आता मेकर्सची आभारी आहे की, आपल्या इंडस्ट्रीत त्यांनी असे सीन्स करण्यासाठी समन्वयक नेमले आहेत. मी २०१३मध्ये ’मार्गारीटा विथ अ स्ट्रॉ' या चित्रपटात काम केले होते. तेव्हा काही लोक म्हणत होते की, इंटिमेट सीन करणे सोपे आहे, कारण ते अतिशय तांत्रिक पद्धतीने चित्रित केले जाते. पण, मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की, हे सोपं नसतं कारण याच्या आड काही लोक त्याचा गैरफायदाही घेतात.'