मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  भारत सोडून जायला आम्ही काही इंग्रज नाही! चिन्मय मांडलेकरची पत्नी संतापली; नेमकं प्रकरण काय?

भारत सोडून जायला आम्ही काही इंग्रज नाही! चिन्मय मांडलेकरची पत्नी संतापली; नेमकं प्रकरण काय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 21, 2024 11:14 AM IST

चिन्मय मांडेलकर याची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर ही चांगलीच संतापली आहे. नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करून आपलं मत आणि राग व्यक्त केला आहे.

भारत सोडून जायला आम्ही काही इंग्रज नाही! चिन्मय मांडलेकरची पत्नी संतापली; नेमकं प्रकरण काय?
भारत सोडून जायला आम्ही काही इंग्रज नाही! चिन्मय मांडलेकरची पत्नी संतापली; नेमकं प्रकरण काय?

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या प्रचंड ट्रोल होत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखती दरम्यान पुन्हा एकदा त्याच्या मुलाचा नावाचा विषय निघाला. चिन्मय मांडलेकर याने आपल्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवला आहे. या नावावरून त्याला सतत काहीबाही बोललं जातं. चिन्मय मांडलेकरचा हा पॉडकास्ट प्रसारित झाल्यानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्समध्ये लोकांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अतिशय अर्वाच्य भाषा वापरून लोक बोलू लागल्याने, आता चिन्मय मांडेलकर याची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर ही चांगलीच संतापली आहे. नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करून सगळ्याच ट्रोलर्सना उत्तर दिले.

ट्रेंडिंग न्यूज

चिन्मय मांडलेकर याच्या मुलाच्या नावावरून ट्रोल करणाऱ्या लोकांनी त्याला अफगाणिस्तान, पाकिस्तानला जा असाही सल्ला दिला होता. त्यानंतर आता नेहा चांगलीच वैतागली. नेहा जोशी-मांडलेकर हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने आपलं मत आणि राग व्यक्त केला आहे. ट्रोल करताना लोकांनी समोरचा व्यक्ती ही एक माणूस आहे, याचा विचार केला पाहिजे, असे म्हटले आहे. तर, आपल्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ का ठेवलं? या मागचं कारणही तिने स्पष्ट केले आहे. या व्हिडीओत नेहा म्हणाली की, ‘नमस्कार माझं नाव नेहा जोशी-मांडलेकर. मी सगळ्यात आधी माझी जात सांगते, कारण आता सध्या सगळ्यात जास्त महत्त्वाची तीच आहे. मी माहेरकडून देशस्थ ब्राह्मण आहे आणि सासरकडून द्वेष्टा कासार. मी हिंदू आहे आणि हा व्हिडीओ करण्यामागचा एकच कारण, ज्यांना माहित नाही त्यांना सांगते... माझे पती चिन्मय दीपक मांडलेकर, त्यांची ही जात द्वेष्टा कासार आणि तेही हिंदूच आहेत.’

पंकज त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर! रस्ते अपघातात गमावली जवळची व्यक्ती; बहीणही गंभीर जखमी

का ठेवलं ‘जहांगीर’ नाव?

‘गेल्या काही दिवसांपूर्वी चिन्मयने एका पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली होती. या मुलाखतीनंतर त्याला खूप ट्रोल केले गेले. आम्ही सगळेच या गोष्टींना सामोरे जात आहोत. माझे पती हे पब्लिक फिगर आहेत. त्यांचं काम सगळेच रसिक प्रेक्षक पाहतात त्यांना आवडलं, तर ते डोक्यावर घेतात आणि नाही आवडलं तर त्यांनी बोलावं, हा त्यांचा अधिकाराचा आहे. पण सध्या ट्रोलिंग हे माझ्या पतीच्या कामाबद्दल होत नाहीये. तर, आमच्या मुलाच्या नावावरून होतंय. माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे. जहांगीर हे एक पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म २१ मार्च २०१३ रोजी झाला आणि त्या दिवशी म्हणजेच २१ मार्चला जमशेदी नवरोज असतो. तुम्ही स्वतः कॅलेंडर उघडून देखील बघू शकता. जमशेदी नवरोज दिवशी त्याचं नाव जहांगीर ठेवावं, असा निर्णय आम्ही घेतला. आता हे नाव कोणावरून ठेवलं, कसं ठेवलं? हा मुद्दा नंतर येतो’, असं नेहा म्हणाली.

काय आहे ‘जहांगीर’ नावाचा अर्थ?

पुढे नेहा म्हणाली की, ‘मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे. जहांगीर म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला असा जहांगीर. मला माहित नाही इतर लोक आपल्या मुलांची नाव कशी ठेवतात. पण, मी माझ्या दोन्ही मुलांची नावे त्यांच्या गोड अर्थावरून ठेवली आहेत. या शिवाय भारतरत्न जेआरडी टाटा यांचे नावही जहांगीर आहे. टाटा कुटुंब माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. अशी अनेक कुटुंब आहेत, जे आपल्या मुलांची नावे अर्थपूर्ण ठेवतात. आता भारतात असलेल्या प्रत्येक अक्षयचे नाव त्यांच्या पालकांनी अक्षय कुमारच्या नावावरून तर ठेवले नसेलच ना? ‘अक्षय’ या शब्दाचा अर्थ आवडला असेल. आता सुचवणारे असेही सुचवतील की, जग जिंकणारा म्हणता तर, तुम्ही पृथ्वीराज किंवा विक्रमादित्य हे नाव का नाही ठेवलं? त्याचेही अर्थ असेच आहेत. मात्र, आमच्या मुलांचं नाव ठेवण्याचा अधिकार पालक म्हणून आम्हालाच आहे. बरं दुःख काय आहे, तर हे एक मुस्लिम नाव आहे. आपण या देशात मुस्लिमांबरोबर अनेक शतकं एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहोत. अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यात बघाल, तर आपले सुपरस्टार देखील मुसलमान आहेत. क्रिकेटर देखील मुसलमान आहेत. या सुपरस्टारच्या चित्रपटांना हजारो करोडचा व्यवसाय आपणच करून देतो ना? ते चालतं? माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे, यावरून हे ट्रोलिंग आणखी किती वर्ष चालणार आहे?’, असा सवाल नेहा जोशीने या व्हिडीओतून केला आहे.

IPL_Entry_Point