पावसाचा विचार मनात आला की आपोआप मल्हार राग प्रत्येकाला आठवतोच. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात मल्हार राग हा सर्वात जुना राग मानला जातो. हा राग सर्वात मंजुळ रागांपैकी एक आहे. मल्हार म्हणजे विविध गुणांनी सज्ज अशी निसर्गाने पावसाला दिलेली भेटच… ‘मियॉं मल्हार’, ‘गौड मल्हार’, ‘मेघ मल्हार’, ‘रामदासी मल्हार’ आणि ‘सूर मल्हार’ असे मल्हार रागाचे विविध प्रकार. हे राग केवळ पावसाळ्यातच गायले जातात किंवा वाजवले जातात. भारतीय शास्त्रीय संगीत निसर्ग, ऋतु आणि समय चक्रावर आधारित असून त्यांचे स्वरावली बरोबर एक अनोखे नाते आहे. वर्षाऋतू भूमीलाच नव्हे, तर आपल्या मनाला ही जगण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन देते.
‘मल्हार रंग’ (मोसमातील नादमय आविष्कार)चे सादरीकरण शारदा रंगमंच तर्फे करण्यात येत असून, पंचम निषाद संस्थेने हा कार्यक्रम क्यूरेट केला आहे. या कार्यक्रमात किराणा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी मल्हार रंगांचे सादरीकरण करणार आहेत. रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ८ वाजता मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात हा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
कर्नाटकातील हुबळी येथे जन्मलेल्या जयतीर्थ मेवुंडी यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास अनौपचारिकपणे घरातूनच सुरू झाला. घरात ते प्रथम भजन आणि भक्ती गीते गाण्यामध्ये गुंतले. वयाच्या १४व्या वर्षी संगीताप्रती असलेल्या आवडीमुळे त्यांनी पंडित अर्जुनसा नाकोड यांच्याकडे आणि नंतर प्रख्यात पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य श्रीपती पडिगर यांच्याकडे गायनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते. आज जयतीर्थ मेवुंडी हे भारतात किराणा घराण्याचे दीपस्तंभ म्हणून प्रसिद्ध आहेत. शास्त्रीय रागांची प्रगल्भ समज आणि भावनिक सादरीकरणासाठी ते ओळखले जातात.