सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एका रशियन अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू झाल्याचे दिसत आहे. ही अभिनेत्री समुद्रकिनारी बसून आरामात योग करत असते. पण अचानक मोठी लाट येते आणि सोबत या अभिनेत्रीला देखील वाहून घेऊन जाते. दगडावर जोरात डोके आपटल्यामुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ जगभरात व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीचे नाव कमिला बेल्यातस्काया असे आहे. ती थायलंडला फिरायला गेली होती. तेथील कोह सामुईच्या खडकावर बसून ही २४ वर्षीय अभिनेत्री योग करत होती. अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो. त्यानंतर एक मोठी लाट येते आणि अभिनेत्री दगडावरुन घसरते. पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे ती तेथून वाहून जाते. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. त्यांना अभिनेत्रीची योग मॅट समुद्रात तरंगत असल्याचे दिसते. त्यानंतर पोलीस अभिनेत्रीचा मृतदेह समुद्रातून काढताना दिसतात.
या घटनेनंतर, स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि खडकाळ भागात प्रवेश प्रतिबंधित केला आहे. अशी माहिती स्थानिक माध्यमांकडून मिळत आहे. सामुईरेस्क्यू सेंटरचे प्रमुख चैपोर्न सबप्रासेट म्हणाले, ‘पावसाळ्याच्या काळात, आम्ही पर्यटकांना सतत चेतावणी देतो’.
या अपघातापूर्वीही कमिलाने या ठिकाणाचं सौंदर्य दाखवणारी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने सांगितले होते की तिला कोह सामुई प्रचंड आवडतो. समुद्राचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने, “मला समुई प्रचंड आवडतं. हे खडक मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्वोत्तम गोष्ट आहे” असे म्हटले होते. अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिय देत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या दुर्दैवी अपघाताची चर्चा रंगली आहे.
वाचा: प्रियकरासोबतचा वाद कोर्टापर्यंत गेला, आकस्मिक मृत्यू झाला! पद्मा चव्हाण यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं?
अभिनेत्री कमिला रशियामधील नोवोसिबिर्स्क येथील आहे. ती बॉयफ्रेंडसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी थायलंडला गेली होती. तिला कोह सामुई प्रचंड आवडत असल्यामुळे ती सतत तेथे जात होती. अभिनेत्रीने तेथील फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एकदा तर तिने ‘पृथ्वीवरील सर्वात चांगली जागा…’ असे म्हणत फोटो शेअर केला होता.
संबंधित बातम्या