Aishwarya Abhishek Viral Video Check: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी चाहत्यांची अतिशय लाडकी जोडी आहे. दोघांची जोडी नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरते. या दोघांना एकत्र पाहून चाहते देखील नेहमीच खूप खूश होतात. मात्र, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात काही महिन्यांपासून दुरावा येत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. या बातम्यांमुळे चाहत्यांची खूप निराशा झाली होती. या बातम्यांदरम्यान आता ऐश्वर्या आणि अभिषेकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते खूप खुश झाले होते. मात्र, चाहत्यांचा हा आनंद फारकाळ टिकू शकलेला नाही.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो प्रचंड चर्चेत आहे. aishwaryaraibachchan_arb नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ दुबई विमानतळावरील असल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये अभिषेक रेड कलरची हुडी आणि ब्लॅक शॉर्ट्स परिधान करून दिसला होता. तर, ऐश्वर्या राय-बच्चन काळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यांची मुलगी आराध्या बच्चन लाल टी-शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम परिधान करून वडिलांच्या मागे चालताना दिसत आहे. हे संपूर्ण कुटुंब एकत्र बसमध्ये बसण्यास जात असताना दिसत आहे.
बच्चन कुटुंबाचा हा व्हिडीओ पाहून ऐश्वर्या आणि अभिषेकचे चाहते खूश झाले आहेत. तर काही नेटिझन्स या व्हिडीओला जुना व्हिडीओ असल्याचे म्हणत आहेत. यावर कमेंट करत एका युजरने लिहिले की, हा व्हिडीओ आताचा नसून गेल्या वर्षी दुबईत झालेल्या एका अवॉर्ड शोदरम्यानचा आहे. आणखी एका युजरने लिहिले की, तुम्हाला आराध्याची हेअरस्टाईल पाहिली ते लक्षात येईल, ती आधीची हेअरस्टाईल आहे. कारण आता आराध्या हेअर बँग ठेवत नाही.
अलीकडेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या बातमीला जोरदार हवा मिळाली होती. या घटस्फोटाच्या बातम्यांना तेव्हा अधिक रंगत आली, जेव्हा ते दोघे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात स्वतंत्रपणे पोहोचले होते. ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या या लग्नाला एकत्र उपस्थित होत्या. तर, अभिषेक बच्चन मात्र त्याच्या आई, वडील आणि बहिणीसोबत लग्नात पोहोचला होता. अशातच सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या नात्याविषयीच्या गोष्टी समोर येऊ लागल्या होत्या.