Salman Khan Viral Video: बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याने बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या दरम्यानचे त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर, या दरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते थोडे अस्वस्थ झाले आहेत. त्याच्या प्रत्येक चाहत्याला अभिनेत्याची चिंता सतावत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान आपल्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करतो आणि या दरम्यान तो अनेकदा अडखळतो. यानंतर तो सोफ्याच्या मागच्या भागाचा आधार घेतो आणि उठून उभा राहतो.
सलमान खान याने नुकतीच मुंबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने देखील हजेरी लावली होती. यावेळी सोनालीला पाहून तिला भेटण्यासाठी सलमान सोफ्यावरून उठण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याला सोफ्यावरून उठून उभे राहताना अडखळायला होत होते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सलमानचे चाहते थोडे अस्वस्थ झाले आहेत. नुकतीच सलमान खानच्या बरगडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
मात्र, तरीही या कार्यक्रमात सलमान त्याच्या 'वॉन्टेड' चित्रपटातील ‘तेरा ही जलवा’ या गाण्यावरही डान्स करताना दिसला. सोनाली बेंद्रेला भेटल्यावर चाहत्यांना दोघांचे पुनर्मिलन खूप आवडले. 'हम साथ साथ हैं' या चित्रपटातील सलमान आणि सोनालीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.
सलमान खानच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर तो आता ‘सिकंदर’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. पहिल्यांदाच सलमान आणि रश्मिकाची जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय सलमान या चित्रपटाच्या माध्यमातून साजिद नाडियाडवालासोबत ही पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहे. या दोघांनी यापूर्वी ‘किक’, ‘जुडवा’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सलमान खान हा मोठा गणेशभक्त आहे. दरवर्षी तो त्याच्या घरी गणपतीची स्थापना करतो. या कार्यक्रमात त्याने गणेशोत्सवाशी संबंधित एक चांगली गोष्ट सांगितली आहे. ज्यावर लोकांच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात सलमान खान म्हणाला की, लोक ज्या पद्धतीने गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतात ते पर्यावरणासाठी अजिबात चांगले नाही. त्याने यावेळी लोकांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची विनंती केली.