Vinod Khanna Birthday : यशाच्या शिखरावर असताना बनले होते संन्यासी; ओशोंसोबत अमेरिकाही गाठली! वाचा विनोद खन्नांची कहाणी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vinod Khanna Birthday : यशाच्या शिखरावर असताना बनले होते संन्यासी; ओशोंसोबत अमेरिकाही गाठली! वाचा विनोद खन्नांची कहाणी

Vinod Khanna Birthday : यशाच्या शिखरावर असताना बनले होते संन्यासी; ओशोंसोबत अमेरिकाही गाठली! वाचा विनोद खन्नांची कहाणी

Oct 06, 2024 08:08 AM IST

Vinod Khanna Birth Anniversary:अभिनेता विनोद खन्ना हे बॉलिवूडचे सुपरस्टार होते, ज्यांनी ‘चांदनी’, ‘दयावान’, ‘अमर अकबर अँथनी’ सारखे सुपरहिट चित्रपट देऊन इतिहास रचला होता.

Vinod Khanna Birth Anniversary
Vinod Khanna Birth Anniversary

Vinod Khanna Birth Anniversary : बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा आज वाढदिवस आहे. २७ एप्रिल २०१७ रोजी मूत्राशयाच्या कर्करोगामुळे विनोद खन्ना यांचे निधन झाले. २०१०पासून त्यांना हा कर्करोग झाला होता. विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ रोजी पेशावर (पाकिस्तान) येथे झाला होता. अभिनेता विनोद खन्ना हे बॉलिवूडचे सुपरस्टार होते, ज्यांनी ‘चांदनी’, ‘दयावान’, ‘अमर अकबर अँथनी’ सारखे सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये इतिहास रचला. विनोद खन्ना यांच्या निधनानंतरही त्यांच्या चाहत्यांना त्यांचा आवडता सुपरस्टार आजही आठवतो.

विनोद खन्ना यांनी १९६९मध्ये ‘मन का मीत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटात खलनायकाची भूमिका केली होती. पण, तेच या चित्रपटाच्या हीरोपेक्षा जास्त भाव खाऊन गेले. सुनील दत्त यांनी आपल्या भावाला लाँच करण्यासाठी हा चित्रपट बनवला होता. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खलनायक बनलेले विनोद खन्ना सर्वांच्या नजरेत भरले. त्यानंतर विनोद खन्ना ‘हीरो’च्या रुपात लाखो लोकांच्या हृदयांची धडकन बनले.

विनोद खन्ना यांचे सुपरहिट चित्रपट

विनोद खन्ना यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, ज्यात ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेश्मा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘जुर्म’ यांसारखे चित्रपट आहेत. विनोद खन्ना हे असे अभिनेते होते, ज्यांची बॉलिवूडमध्ये कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. आपल्या मेहनतीने त्याने बॉलिवूडमध्ये एक स्थान मिळवले.

Vinod Khanna birth Anniversary: दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही डिंपल कपाडियांना किस करत होते विनोद खन्ना

विनोद खन्ना यांनी राजकारणात केलेला प्रवेश

विनोद खन्ना १९९७मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि १९९८मध्ये गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून विनोद खन्ना चौथ्यांदा संसदेत पोहोचले. यापूर्वी त्यांनी १९९९ आणि २००४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला होता. २००९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. २००२मध्ये ते केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रीही होते.

चित्रपट सोडले आणि संन्यासी बनले! 

विनोद खन्ना त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर ओशोंच्या प्रभावाखाली संन्यासी बनले होते. विनोद खन्ना हे अनेकदा पुण्यातील ओशोंच्या आश्रमात जात असत, ते त्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरणही पुण्यातच करायचे. जेणेकरून त्यांना ओशोंसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळायची. १९७५ मध्ये विनोद खन्ना सर्व काही सोडून ओशोंसोबत अमेरिकेला गेले होते. मात्र, काही वर्षांनी त्यांना पुन्हा मनोरंजन विश्वाची आठवण आली आणि ते भारतात परतून काम करू लागले. 

Whats_app_banner