आपल्या दमदार अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने मनोरंजन विश्व गाजवणारे अभिनेते विनय आपटे हे आज या जगात नसले, तरी त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचा मनात कायम जिवंत आहेत. आज (१७ जून) विनय आपटे यांचा वाढदिवस. विनय आपटे यांनी आपल्या अभिनयाने मराठीच नव्हे तर बॉलिवूड देखील गाजवलं. त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले. चित्रपट असो, नाटक असो वा मालिका त्यांनी नेहमीच आपल्या प्रत्येक पात्रात जीव ओतला. असा दमदार अभिनय करणारे अभिनेते विनय आपटे नेहमी आपल्यासोबत पिस्तुल बाळगायचे. त्यामागे एक मोठा किस्सा आहे.
विनय आपटे यांनी जसे चित्रपट आणि मालिका गाजवल्या, तशीच यांनी नाटकं देखील गाजवली. त्यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक तर गाजलंच, पण वादग्रस्तही ठरलं. एक मोहीम हाती घ्यायची असं म्हणत त्यांनी हे नाटक केलं होतं. या नाटकाचं निर्माती उदय धुरत यांनी केली होती. तर, लेखन प्रदीप दळवी यांनी केले होते. अशा ज्वलंत विषयावर आधारित हे नाटक घेऊन ते अनेक दिग्दर्शकांकडे गेले होते. मात्र, प्रत्येकांनी त्यांना नकारच दिला होता. अखेर विनय आपटे यांनी हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी हाती घेतली. विनय आपटे यांनी आधी नाटकाची स्क्रिप्ट व्यवस्थितरित्या वाचून घेतली. इतकंच नाही तर, त्यामध्ये बरेच फेरफारही केले. कारण, सगळ्यांना महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेंनी केली आहे इतकंच माहीत होतं. पण ती का केली? ही दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी या नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न केला.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक कुठेही गांधीजींच्या विरोधात वाटणार नाही, यांची काळजी विनय आपटे यांनी घेतली होती. विशेष म्हणजे त्यांनी या नाटकासाठी सगळेच नवखे कलाकार निवडले होते. या अजरामर नाटकामुळेच मराठी मनोरंजनसृष्टीला अभिनेते शरद पोंक्षे यांच्यासारखे रत्न मिळाले. मात्र, हे नाटक जितकं गाजलं, तितकाच नाटकाला विरोधही झाला. या नाटकामुळे विनय आपटेंनाच नव्हे तर, त्यांच्या कुटुंबालाही जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. ऑफिसमध्येही सतत धमक्यांचे फोन यायचे. त्यामुळे त्या काळात युती सरकारने विनय आपटे यांना पोलीस संरक्षण द्यायचं ठरवलं. त्यावेळी दिवंगत नेते मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
मनोहर जोशी यांनी विनय आपटेंना सांगितलं की, ‘आम्ही तुला पोलीस संरक्षण देतोय. तर, तू असाच बाहेर फिरू नकोस.’ त्यानंतर विनय आपटे यांच्याबरोबर पाच-सहा पोलीस नेहमी असायचे. विनय आपटे जिथेही जातील तिथे हे पोलीस त्यांच्यासोबत असायचे. पोलिसांसाठी विनय यांनी मित्राची गाडी देखील मागून घेतली होती. पण काही काळानंतर विनय यांनी सरकारला हे संरक्षण काढून घ्या, अशी विनंती केली. अखेर सरकारने पोलीस संरक्षणाच्या ऐवजी विनय आपटे यांना रिव्हॉल्व्हरचं लायसन्स देण्याचा निर्णय घेतला. कधी काही असा प्रसंग आला तर स्वसंरक्षणाकरता रिव्हॉल्व्हर जवळ ठेवा, असा आदेश सरकारकडून देण्यात आला. त्यामुळे विनय आपटे नेहमी स्वतःजवळ एक बंदूक ठेवायचे.
संबंधित बातम्या