vikrant massey retirement : आपल्या अभिनयाने सतत लोकांची मने जिंकणारा अभिनेता विक्रांत मेस्सीने कामातून ब्रेक घेण्याची घोषणा करून सर्वांना चकीत केले आहे. 'छपाक', 'हसीन दिलरुबा', ‘१२वी फेल’ आणि 'द साबरमती रिपोर्ट' यांसारखे अप्रतिम सिनेमे करणारा विक्रांत मेस्सी इतक्या लवकर सिनेसृष्टीचा निरोप घेईल, असे कुणालाच वाटले नव्हते. आता या मागे नेमके काय कारण असेल, यावर वेगवेगळे कयास बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दरम्यान, काही ट्रेड एक्सपर्ट्सनीही विक्रांत मेस्सीच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ओव्हरएक्सपोजर टाळण्यासाठी विक्रांतने हे पाऊल उचलले असावे, असे एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने म्हटले आहे.
विक्रांत मेस्सीसाठी त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा करण्याचा हा एक चांगला मार्ग ठरू शकतो, असं ट्रेड एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. विक्रांत मेस्सी आपला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तेव्हा प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याने सोमवारी एक पोस्ट पोस्ट करत आपल्या अभिनय प्रवासात नेहमीच आपल्यासोबत राहिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आता त्याच्यावर स्वतःचं पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ आली आहे आणि प्रेक्षक त्याला त्याच्या पुढच्या चित्रपटात शेवटचं पाहतील.
विक्रांत मेस्सीच्या या पोस्टवर आणि त्याच्या निर्णयावर इंडस्ट्रीतील सर्व लोकांची आपापली मतं आहेत. विक्रांतच्या या निर्णयाकडे प्रत्येकजण आपापल्या नजरेने पाहत आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रांत मेस्सीसोबत काम केलेल्या एका चित्रपट निर्मात्याने सांगितले की, चित्रपटसृष्टीत ओव्हरएक्सपोजरच्या (जास्त लाइमलाइट मिळणे) भीतीमुळे त्याने हा निर्णय घेतला असावा. विक्रांत मेस्सीचे काम पाहता त्याला ओटीटी आणि मोठ्या पडद्यासाठी भरपूर ऑफर्स येत आहेत.
कदाचित यामुळेच त्याला आपल्या कामाचा दर्जा राखायचा आहे, त्यासाठी त्याला थोडी विश्रांती घेण्याची गरज आहे. विक्रांत मेस्सीच्या अचानक इंडस्ट्री सोडण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना एक दिग्दर्शक म्हणाला की, ‘संभाषणादरम्यान त्याने अनेकदा सांगितले आहे की, तो एकत्र इतके सिनेमे करत आहे, असे करून तो आपल्या प्रेक्षकांना भुरळ घालेल का? त्यामुळे अशा प्रकारे ब्रेक घेणं आणि स्वत:ला वेळ देणं हा अतिशय धाडसी निर्णय आहे.’ तर एका ट्रेड एक्सपर्टने सांगितले की, ‘डॉन-३’मध्ये रणवीर सिंहच्या विरुद्ध विक्रांत मेस्सी खलनायकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या घोषणेसाठी वातावरण तयार करण्याचा हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो.
संबंधित बातम्या