vikrant massey viral post on retirment : बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी इंडस्ट्रीमध्ये त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. विक्रांतचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसली, तरी त्यातील विक्रांतच्या अभिनयाचे भरभरून कौतुक होत आहे. अशातच आता विक्रांतच्या एका पोस्टने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. १ डिसेंबर रोजी विक्रांत मेस्सीने अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली. विक्रांतची पोस्ट समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या जोरदार कमेंट्स येत आहेत.
विक्रांत मेस्सीने १ डिसेंबरच्या पहाटे आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिले की, ‘नमस्ते, मागील काही वर्षे आणि त्यानंतरचा काळ विलक्षण होता. आपल्या अखंड पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण जसजसे मी पुढे जात आहे, तसतसे मला जाणवू लागले आहे की आता स्वत: ला पुन्हा शस्त्रसज्ज करण्याची आणि घरी परत जाण्याची वेळ आली आहे. एक पती, वडील आणि मुलगा म्हणून आणि अभिनेता म्हणूनही… त्यामुळे २०२५ मध्ये आपण एकमेकांना शेवटचं भेटणार आहोत. जोपर्यंत योग्य वेळ येत नाही. शेवटचे दोन सिनेमे आणि अनेक वर्षांच्या आठवणी. पुन्हा एकदा धन्यवाद. प्रत्येक गोष्टीसाठी आणि मधल्या काळात घडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी... मी कायम ऋणी राहीन.’ यासोबतच अभिनेत्याने हात जोडलेला इमोजीही शेअर केला आहे.
विक्रांत मेस्सीची ही पोस्ट सोशल मीडियावर विशेषत: त्याच्या चाहत्यांमध्ये खूपच निराशाजनक वातावरण निर्माण करत आहे. तो इतक्या लवकर अभिनयातून निवृत्त होईल, अशी कुणालाही अपेक्षा नव्हती. अनेक युजर्सनी या निर्णयावर कमेंट करत आपला निर्णय योग्य नसल्याचं म्हटलं आहे, तर अनेकांना आता त्यांना पडद्यावर पाहता येत नसल्याच्या दु:ख वाटत असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने लिहिले की, ‘माझा एकमेव आवडता अभिनेता बॉलिवूड सोडत आहे.’ दुसऱ्या एकाने लिहिलं की, ‘तू आणखी एक मोठा चित्रपट दिला असतास, पण आधीच धक्का दिलास याचं खूप दु:ख आहे.’ एक जण म्हणाला की, ‘मला वाटतं तुझ्या निर्णय योग्य नाही. तू तो बदलशील.’ या पोस्टवर आणखी अनेक कमेंट्स आल्या आहेत, ज्यात युजर्सचा विक्रांतच्या निर्णयावर विश्वास बसत नाहीये.
संबंधित बातम्या